पेणमध्ये घुमू लागला ढोलकीचा नाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेणमध्ये घुमू लागला ढोलकीचा नाद
पेणमध्ये घुमू लागला ढोलकीचा नाद

पेणमध्ये घुमू लागला ढोलकीचा नाद

sakal_logo
By

पेण, ता. ११ (वार्ताहर) : श्रावण महिना सुरू झाला की खऱ्या अर्थाने सणांना सुरुवात होते. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला आणि त्‍यानंतर येणाऱ्या गणेशोत्‍सवामुळे बाजारपेठ गजबजलेली असते. कोकणात गणेशभक्‍तांकडून महिनाभर आधीच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते. भक्‍तांकडून आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्‍सवासाठी राज्यासह परराज्यांतील ढोलकी व्यावसायिक सध्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्‍याने सर्वत्र ढोलकीचा नाद घुमू लागला आहे.
सार्वजनिक अथवा घरगुती गणेशोत्‍सवात अनेकदा ढोलकीच्या तालावर आरती गायली जाते. पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगात प्रसिद्ध असल्याने पेणच्या मूर्तीं सातासमुद्रापार जात आहेत. बाजारपेठेत डेरेदाखल झालेले ढोलकी विक्रेते उत्तर प्रदेशातून आले असून त्‍यांच्याकडे छोट्या-मोठ्या आकाराच्या ढोलक्‍या अवघ्‍या २०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्‍ध आहेत. गणेशमूर्ती खरेदीसाठी येणारे भक्तगण येथूनच ढोलकी खरेदी करताना दिसतात; तर दिवसाला १२ ते १५ ढोलक्‍यांची विक्री होत असल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात आले.

किमतीत ५० रुपयांची वाढ
ढोलकी बनविण्याचे साहित्‍य महागल्‍याने यंदा ढोलकीच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र राज्य सरकारने निर्बंध हटवल्‍याने यंदा गणेशोत्सव आनंदात साजरा होणार असून ढोलक्‍यांची विक्रीही अधिक होईल, असा विश्‍वास विक्रेत्‍यांना आहे.

गणेशोत्सवाच्या एक-दीड महिना आधीपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत ढोलकी घेऊन येतो. पेणच्या बाजारपेठेत अनेक वर्षांपासून येत असून येथे ढोलक्यांना चांगली मागणी आहे. पण महागाई भरमसाट वाढल्याने नाईलाजाने ढोलकीचे भाव वाढवावे लागले आहेत. आमचे कुटुंब दिवसभर गावागावांमध्ये फिरून विक्री करते. दोन वर्षे कोरोनामुळे व्यवसाय ठप्प होता, त्‍यामुळे यंदा चांगला व्यवसाय होईल, अशी अपेक्षा आहे.
- अरीफ अन्सारी, ढोलकी विक्रेते, उत्तर प्रदेश

दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला, मात्र यंदा उत्सव जल्‍लोषात साजरा करणार आहोत. गणेशोत्सवात प्रत्‍येकाच्या घरी आरती, भजन, हरिपाठ सुरू असतात. त्यामुळे ढोलकीही तितकीच महत्त्‍वाची आहे. पेणमध्ये आलेल्‍या विक्रेत्‍यांची ढोलकी चांगली असल्‍याने खरेदी केली आहे.
- गणेश पाटील, गणेशभक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92283 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..