वसई-विराला क्षयरोगाने ग्रासले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विराला क्षयरोगाने ग्रासले
वसई-विराला क्षयरोगाने ग्रासले

वसई-विराला क्षयरोगाने ग्रासले

sakal_logo
By

वसई, ता. १० (बातमीदार) : वसई विरार शहरात महापालिकेने जानेवारीपासून १० ऑगस्टपर्यंत ५ लाख ७६ हजार ७६२ लोकसंख्येचा सर्व्हे केल्यावर क्षयरोगाचे २,४०८ सक्रिय रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे; तर ज्या लोकवस्तीत सर्व्हे झालेला नाही, तेथे तो केला जाणार असल्याने क्षयरोगाची आकडेवारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या २५ लाख इतकी आहे. तसेच दाटीवाटीच्या वस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक आजार बळावत असतात. त्यामुळे प्रशासनाने सक्रिय क्षयरोग शोधमोहिमेंतर्गत घरोघरी सर्व्हे सुरू केला. यात मोठ्या संख्येने क्षयरोग रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर उपचार आहेत; तर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन घटणे, थुंकीवाटे रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवरील गाठ अशी लक्षणे असलेल्यांचे थुंकीचे नमुने तपासले जात आहेत. तपासणीसाठी वसई विरार महापालिकेने १५ लॅबची व्यवस्था केली आहे.

महापालिका क्षेत्रातील २०२० व २०२१ या वर्षांची तुलना केली असता यंदा आढळलेले रुग्ण अधिक आहेत. कामगार, झोपडपट्टीत राहणारे अथवा आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या व्यक्तींना क्षयरोगाचे उपचार घेताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शासनामार्फत प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत ५०० रुपयांची मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जात आहे. मात्र ही मदत तोकडी आहे. त्यामुळे महापालिकेने केंद्र सरकाच्या निक्षय मित्र ही संकल्पनादेखील राबविण्यास सुरुवात केली आहे.
-------------------------
पालिकेची उद्योजक, सामाजिक संस्थांकडे धाव
क्षयरुग्णांना किमान १ वर्षासाठी प्राधान्याने अतिरिक्त पोषण आहार तसेच वैद्यकीय मदत उद्योगसमूह, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती इत्यादींच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहे. जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना याचा लाभ मिळू शकतो. यासाठी वसई विरार शहर महापालिका आरोग्य विभाग मुख्यालय अथवा dtomhvvm@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे ‘निक्षय मित्र’ म्हणून संपर्क साधावा, असे आवाहनदेखील महापालिकेने केले आहे.
------------------------
महापालिका क्षेत्रात क्षयरोगाचे सक्रिय रुग्ण तपासण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार जानेवारी ते ऑगस्ट महिन्यात २ हजाराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. क्षयरोगाची लक्षणे आढळली, तर त्वरित महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- डॉ. समीर झापर्डे, क्षयरोग विभाग, महापालिका
------------------------
रुग्णांची आकडेवारी
२०२० - ३,२००
२०२१ - ३,७००
२०२२ (जानेवारी ते ऑगस्ट ) - २,४०८
-------------------------
क्षयरोग टाळण्यासाठी काय कराल?
पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. याचबरोबर लक्षणे आढळली, तर वेळ न दवडता तपासणी करून घेतल्यास पुढचा धोका टळू शकतो.
-----------------------
वसई : सक्रिय क्षयरोग शोधमोहिमेसाठी घरोघरी सर्व्हे सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92293 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..