कल्याण डोंबिवलीत दोन मंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीत दोन मंत्री
कल्याण डोंबिवलीत दोन मंत्री

कल्याण डोंबिवलीत दोन मंत्री

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १० : कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. राज्यातील सत्ता बदलानंतर ठाण्याला मुख्यमंत्री पदाचा, तर कल्याण-डोंबिवलीला एक केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. गेली अनेक वर्षे कल्याण-डोंबिवलीत युतीची सत्ता असताना शहराचा विकास होऊ शकला नाही. आता शिंदे व फडणवीस सरकार संथगती कामांना गतिमान करण्याकडे लक्ष देणार असल्याचे विधान नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. सध्‍याच्‍या सरकारमध्‍ये एकाच मतदारसंघातील तीन मंत्री असताना आता तरी कल्याण-डोंबिवलीचा विकास होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

नियोजनशून्य शहर, वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली चाळण, बेकायदा बांधकामे, पाणी, आरोग्य या समस्या गेले कित्येक वर्षे कल्याण-डोंबिवलीच्‍या पाचवीलाच पुजल्‍या आहेत. केडीएमसीमध्ये गेले कित्येक वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. युतीची सत्ता असताना शहराचा विकास झाला नाही. राज्यात युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यात कोरोना काळ आल्याने शहरातील विकासकामांना खीळच बसली. विकास कामांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. शहरातील रस्ते दर्जेदार व्हावे म्हणून फडणवीस सरकारच्या काळात एमएमआरडीएकडून ४७० कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यातून डोंबिवलीतील ३४ रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे निश्चित झाले असताना ही कामे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केल्याचा आरोप करत चव्हाण यांनी शिंदे हेच विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे एमएसआरडीसीकडून रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करत विकास आम्हीच करत असल्याचे दाखवून देत होते. दोन पक्षांच्या या राजकीय वादात शहरातील रस्त्यांची परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे. तसेच रिंगरोड प्रकल्प, मेट्रो यांची कामे संथगतीने सुरू आहेत. लोकग्राम पादचारी पूल, कल्याण पत्रीपूल, कल्याण-शिळ रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण, देसाई खाडी पूल, शहरांतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण यांसारखी अनेक विकास कामेही प्रलंबित आहेत. ही कामे पूर्णत्वास नेण्याकडे आता नवीन सरकार काय प्रयत्न करते हे पाहणे नागरिकांच्‍या दृष्‍टीने औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.
शहराच्‍या विकासाकडे यापूर्वी दुर्लक्ष
राज्यात सत्तांतरानंतर फडणवीस सरकार येताच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली. याआधीही फडणवीस सरकारच्या काळात चव्हाण यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा कार्यभार होता. राज्यमंत्रिपद चव्हाण यांच्याकडे असूनही त्यांचे राज्‍यात दौरे जास्त असल्याने कल्याण-डोंबिवलीच्या विकासकामांकडे चव्हाण यांचे दुर्लक्ष झाले होते. कल्याण पश्चिमचे खासदार कपिल पाटील हे पंचायत राज राज्यमंत्री आहेत. यामुळे केंद्रात व राज्यात एक मंत्रिपद, शिवाय मुख्यमंत्री शिंदे हे देखील चव्हाण यांच्याजवळचे असल्याने आता तरी शहराचा विकास व्हावा, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एमएमआर रिजनमध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे, वाहतूक कोंडीतून हा परिसर मुक्त झाला पाहिजे यासाठी रिंग रोड, मेट्रो किंवा इतर जे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प जे गेल्या काही काळापासून संथगतीने सुरू आहेत. त्यांना येत्या काळात गती प्राप्त होईल. यामुळे येणारा काळ हा येथील नागरिकांसाठी सुखावह असेल याकडे नक्की लक्ष देण्‍यात येईल, असे मत नवनिर्वाचित मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्‍यक्‍त केले. त्‍यांच्‍या मंत्रिपदाच्‍या कामगिरीकडे आता कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92310 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..