घरकुलाच्या मजुरीसाठी आदिवासींची फरपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरकुलाच्या मजुरीसाठी आदिवासींची फरपट
घरकुलाच्या मजुरीसाठी आदिवासींची फरपट

घरकुलाच्या मजुरीसाठी आदिवासींची फरपट

sakal_logo
By

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १० : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पालघरमधील हजारो आदिवासी कुटुंब बेघर असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यात गेल्या पाच वर्षांपासून मोखाड्यात ज्यांना घरकुल मिळाले त्या लाभार्थ्यीना शेवटचा मजुरीचा हप्ताच मिळालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. आदिवासी लाभार्थ्यांनी याबाबत अनेकदा पंचायत समिती कार्यालयाला खेटे मारूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार देशातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे; परंतु पालघर जिल्ह्यात सुमारे १२ हजारांहून अधिक कुटुंबे बेघर असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे सन २०१७-१८ पासून घरकुल बांधलेल्या शेकडो लाभार्थ्यांना शेवटचा मजुरीचा हप्ताच मिळालेला नाही. घरकुल योजना नरेगातून राबवली जाते. मजुराच्या हाताला काम आणि निवारा या दोन्ही बाबींचा विचार करून शासनाने ही योजना अमलात आणली आहे.
घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्याला २६९ चौरस फुटांचे घरकुल बाधून दिले जाते. त्यासाठी शासनाकडून एक लाखाचे अनुदान दिले जाते. तसेच नरेगातून २० हजारांची मजुरी लाभार्थ्याला दिली जाते. वाढत्या महागाईत तुटपुंज्या सरकारी अनुदानात घरकुल बांधून पूर्ण होत नाही. त्यामुळे लाभार्थ्याला उसनवारी करून घरकुल पूर्ण करावे लागते आहे. त्यातच मजुरीचा शेवटचा हप्ता न मिळाल्याने आदिवासी मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे.
.....
प्रशासनाची चुप्पी
या प्रकाराची माहिती घेण्यासाठी मोखाडा पंचायत समिती कार्यालयातील नरेगाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्याला सांगूनही संबंधित अधिकाऱ्याने कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे मजुरीच्या रकमेचा अपहार झाल्याचा संशय अधिकच बळावला आहे.
....
तालुक्यातील शेकडो घरकुल आदिवासी लाभार्थ्यींचा शेवटचा मजुरीचा हप्ता २०१७ पासून मिळालेला नाही. अनेकदा मोखाडा पंचायत समिती कार्यालयाला फेऱ्या मारल्या आहेत. मात्र, नरेगा विभागाकडून वर्क कोड ओपन होत नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे या मजुरीच्या रकमेचा अपहार झाला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
- हनुमंत पादिर, माजी सरपंच, काष्टी सावर्डे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92318 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..