बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणार
बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणार

बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघा काही कालावधी उरला आहे. दोन दिवसांत बारवी धरण व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठ्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ११ ऑगस्टला बारवी धरणात ३३४.१९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९८.६३ टक्के पाणीसाठा आहे. ९ ऑगस्टला धरणात ९१ टक्के पाणीसाठा होता. १० ऑगस्टला ९४ टक्क्यांवर पाणीसाठा गेला होता.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. धरण परिसरात शून्य मिमी पावसाची नोंद होत होती. यामुळे बारवी पूर्ण क्षमतेने भरण्यास विलंब होण्याची चर्चा सुरू होती; मात्र गेल्या पाच दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ३० जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत धरणातील पाणीसाठा हा ८६ टक्क्यांवर स्थिरावला होता. धरण परिसरात ०० मिमी पावसाची नोंद त्यादरम्यान झाली होती. ७ तारखेपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. चांगला पाऊस पडल्याने ९ तारखेला पाणीसाठा हा ९१ टक्क्यांवर पोहोचला. दोन दिवसांत धरण परिसरात सरासरी अनुक्रमे ८७ व ५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पाणीसाठा आजच्या घडीला ९८.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास अवघ्या काही तासांत बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या वर्षीचे पाण्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.
---
मागील वर्षीपेक्षा १६ टक्के अधिक पाणीसाठा
११ ऑगस्ट २०२१ ला बारवी धरणात २७८.६४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८२.२३ टक्के पाणीसाठा होता. या वर्षी २०२२ मध्ये ११ ऑगस्टला धरणात ३३४.१९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९८.६३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी यंदा पाणीसाठा जास्त आहे.
---
सतर्कतेचा इशारा
बारवी धरण भरण्यास अवघा दीड टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहे. धरणावर स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडले जातील. यामुळे धरण परिसर, नदीकाठची गावे व अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92457 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..