‘सूर्या’च्या पाणी वितरणाला अमृत योजनेचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सूर्या’च्या पाणी वितरणाला अमृत योजनेचा आधार
‘सूर्या’च्या पाणी वितरणाला अमृत योजनेचा आधार

‘सूर्या’च्या पाणी वितरणाला अमृत योजनेचा आधार

sakal_logo
By

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : सूर्या धरण योजनेतून मिळणाऱ्या पाण्याच्या मिरा भाईंदर शहरातील अंतर्गत वितरणासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून ४७८ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पाणी वितरणाचा हा प्रस्ताव मान्यतेसाठी आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रात व राज्यात एकच सरकार असल्यामुळे केंद्राकडून योजनेला लवकरात लवकर मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आधी या योजनेसाठी राज्य सरकारच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध होणार होता.
मिरा भाईंदर व वसई विरार या दोन शहरांसाठी एमएमआरडीए सूर्या धरण पाणी योजना राबवत आहे. या योजनेतून मिरा भाईंदरला २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून २०२३ च्या अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होणार आहे; पण मिळणारे २१८ दशलक्ष लिटर पाणी एमएमआरडीए मिरा भाईंदर शहराच्या प्रवेशद्वारावर देणार आहे. त्यानंतर हे पाणी साठवण्याची तसेच त्याचे शहरात वितरण करण्याची जबाबदारी मिरा भाईंदर महापालिकेवर आहे. यासाठी नवीन साठवण टाक्या, जलवाहिन्या, जलकुंभ बांधण्याची आवश्यकता असून या कामासाठी ४७८ कोटी रुपये इतका महापालिकेला खर्च येणार आहे.
महापालिकेकडे इतका निधी नसल्यामुळे राज्य सरकारच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून हा निधी मिळावा, अशी विनंती महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूददेखील करण्यात आली होती, अशी माहिती आमदार गीता जैन यांनी मार्च महिन्यात दिली होती; मात्र आता हा निधी अमृत योजनेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तसे केंद्र सरकारचे आदेशही जारी झाले आहेत.
.....
जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता
महापालिकेने पाणी वितरणासंदर्भातला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून या डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यतादेखील मिळाली आहे. राज्य स्तरावर नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. केंद्राची मान्यता मिळाली, की राज्यस्तरीय समिती पुन्हा या डीपीआरची तांत्रिक तपासणी करेल. नंतर या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणार आहे, अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.
पाणीप्रश्न सुटणार
मिरा भाईंदर शहराला सध्या आवश्यकतेपेक्षा दररोज २५ ते ३० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. सूर्या धरण योजना येत्या दोन वर्षांत कार्यान्वित झाली, तर शहराचा पुढील तीस वर्षांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92471 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..