एक नारळ दिलाय दर्या देवाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक नारळ दिलाय दर्या देवाला
एक नारळ दिलाय दर्या देवाला

एक नारळ दिलाय दर्या देवाला

sakal_logo
By

वसई, ता. ११ (बातमीदार) : नारळी पौर्णिमेनिमित्त बँडच्या तालावर, पारंपरिक कोळी गीतांनी पालघर जिल्ह्यात कोळी बांधवांनी दर्याराजाला मानाचा नारळ अर्पण केला. या वेळी मोठ्या उत्साहात मिवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करत महिलांसह लहान मुलांनी सहभाग घेतला असल्याचे पाहावयास मिळाले.
पालघर, सातपाटी, वसई पाचूबंदर, अर्नाळा, नायगाव, डहाणू येथे समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधवांची गर्दी झाली होती. प्रथम दाम्पत्यांनी पूजा करून देवाकडे प्रार्थना केली. त्यानंतर कोळीवाड्यातून ग्रामस्थांच्या मिरवणुकीने सागरी किनारा गाठला. या वेळी सागर पूजन करण्यात आले व मानाचा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. सागरी किनारी कोळी बांधवांचे वास्तव्य आहे. मच्छीमारी करण्यासाठी घरातील पुरुषमंडळी हे नारळी पौर्णिमेला पूजा करून खोल समुद्रात जात असतात व महिला घरची जबाबदारी सांभाळत असतात. आपला कुटुंब सदस्य सुखरूप यावा, मासे भरपूर मिळावेत म्हणून नारळी पौर्णिमेला सागराची पूजा व प्रार्थना करतात, ही परंपरा आजतायागत सुरू आहे. घरी नारळापासून खमंग पदार्थ तयार करण्यात आले होते, याचा आस्वाद ग्रामस्थांनी घेतला व वादळी परिस्थितीला आवर घाल व पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जाऊ दे, अशी प्रार्थना या वेळी समुद्राला करण्यात आली.
---
आमची वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा जपत आहोत. नारळी पौर्णिमा हा आमच्यासाठी आनंद घेऊन येणारा सण असतो. मिरवणूक, बँडच्या तालावर नृत्य करत समुद्रापर्यंत गेलो व समुद्राला नारळ अर्पण केला. ग्रामस्थ यानिमित्ताने एकत्र येतात व सामाजिक एकोपा जपत आहोत.
विक्रम वसईकर, कोळी बांधव

झाई येथे सागर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात
बोर्डी, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर मच्छीमार लोकवस्ती असलेल्या झाई गावात सागरपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे सामुदायिक सागर पूजनाचा कार्यक्रम करता आला नव्हता; मात्र यंदा कोरोना आटोक्यात आल्यामुळे सामुदायिक कार्यक्रम करण्यात आला. या वेळी गावातील हजारो ग्रामस्थ, बालगोपाळ यांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला. झाईच्या जेटीवर सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर श्रीफळ अर्पण करून सागर पूजन पार पडले.

समुद्राला मच्छीमारांनी घातले साकडे
डहाणू, ता. ११ (बातमीदार) : धाकटी डहाणू येथे मच्छीमार बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून आणि ढोल, लेझीमच्या गजरात नारळी पौर्णिमेनिमित्त सागराला सोन्याचा नारळ अर्पण केला. समुद्राला साकडे घालत विधिवत पूजा करून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केला. धाकटी डहाणू येथे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमार बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वाजतगाजत मिरवणूक काढली. या वेळी मच्छीमारांनी वाढवण बंद रद्द करण्याच्या घोषणाही देण्यात आल्या; तर मच्छीमार भगिनींनी बोटींची पूजाही केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92524 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..