Independence day 2022 : नवी मुंबईच्या घणसोली गावाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तुम्हाला माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Independence day 2022: Do you know the contribution of Ghansoli village of Navi Mumbai in the freedom struggle?
स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे गाव

Independence day 2022 : नवी मुंबईच्या घणसोली गावाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तुम्हाला माहितीये?

नवी मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून लावण्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन केले जात आहे. तसेच स्वातंत्र्यासाठी झालेले सत्याग्रह, आंदोलनांत स्वतःच्या जीवाची आहुती देऊन इतिहासात अजरामर झालेल्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. नवी मुंबई शहरातील घणसोली गावालादेखील स्वातंत्र्यचळवळीतील योगदानाची पार्श्वमूमी असून लढ्यातील सहभागी स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा दिला गेला आहे. १९३० मध्ये झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या संग्रामाची ठिणगी पडली. या आंदोलनात घणसोली गावातील १०० क्रांतिकारकारांनी सहभाग घेतला होता. या चळवळीचा वणवा घणसोली गावातूनच विखुरला गेला. त्यानंतरच या अन्यायकारी इंग्रजी राजवटीविरोधात उठाव होण्यास सुरुवात झाली. खरा लढा जेव्हा इंग्रजांनी १९३२ मध्ये घणसोली गावात छावणी टाकली तेव्हापासून सुरू झाला.

मिठाचा सत्याग्रह हा गावातील ग्रामस्थांचा मातीसाठी केलेला लढा होता. या लढ्यात गावातील तरुण, मुली, महिला आबालवृद्धांचा सहभाग होता. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये गोठिवली गावातील काना म्हात्रे गंभीर जखमी झाले होते. घणसोलीतून सुरू झालेल्या सत्याग्रहाचे लोण पुढे शिरवणे, सारसोळे, बेलापूर या गावांपर्यंत गेले. घणसोलीतील या आंदोलनकर्त्यांना रसद म्हणून लपण्यासाठी जागा, झेंड्याला कापड, जेवायला शेव-मुरमुरे असे खाद्य ग्रामस्थांकडून मिळायचे. त्यानंतर १९४४ मध्ये मिठाच्या सत्याग्रहातदेखील रामा दिवड्या रानकर, शंकर शनिवार पाटील, नारायण मरोजी मढवी, वाल्मीक महादू पाटील, पदा पोशा पाटील, वामन पदा पाटील, महादू गांडुळ पाटील, आंबो लडक्या पाटील, चाहू आंबो पाटील, जोमा पदा पाटील, वालक्या उंदऱ्या पाटील, परशुराम पदा पाटील आदी स्वातंत्र्यसेनानी सहभागी झाले होते. या लढ्याची दखल महात्मा गांधी यांनी घेतली, पण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, डॉ. राजेंद्र प्रसाद, अरुणा असफअली आणि शंकरराव देव या नेतेमंडळींना आंदोलनकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी घणसोली गावात पाठवले असल्याची नोंद आहे. त्यानंतर देशातील १९२० चे असहकार आंदोलन, १९३० मिठाचा सत्याग्रह, इंग्रजांविरोधात १९३२ मध्ये केलेले जेलभरो आंदोलन, १९४० सविनय कांयदेभंग आणि १९४२ चा चलेजाव या सर्व आंदोलनात घणसोलीतील भूमिपुत्रांनी रक्त सांडले आहे.

शाळकरी मुलांची ‘वानर सेना’
इंग्रजांविरोधात देशभक्त क्रांतिकारांकडून सुरू असलेल्या भूमिगत चळवळींना बळ देण्याचे काम वानर सेनेने केले. घणसोली गावातही अशीच एक वानर सेना स्थापन करण्यात आली होती. यात १२ ते १४ वर्षांतील शाळकरी मुलांचा सहभाग होता. त्या वेळेस सीताराम नागा म्हात्रे, मधुकर हशा म्हात्रे, नामदेव नामा म्हात्रे, शिवा गणा म्हात्रे, दत्तू पोशा म्हात्रे, श्रीधर झोड्या म्हात्रे, कृष्णा नारायण पाटील, सदाम कमळाकर पाटील, रामनाथ रंगनाथ दिवाडकर, बाळाजी आंबो पाटील, सुकऱ्या हाल्या पाटील ही शाळकरी मुले वानरसेनेत होती. सरकारविरोधी पत्रके वाटणे, गोपनीय बैठकांचे संदेश पोहोचवणे, प्रभात फेऱ्या काढणे, अशी जबाबदारी या वानरसेनेवर होती.

क्रांती सेनेचा सक्रिय सहभाग
घणसोली गावातील क्रांतिकारक ग्रामस्थांनी क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या प्रतिसरकारविरोधात केलेल्या आंदोलनातही सहभाग घेतला. गावातील आघाडीचे क्रांतिकारक सीताराम म्हात्रे, गट्टू धर्मा पाटील, विठो हल्या पाटील, बेरक्या काथारी पाटील, बाळा पाटील यांनी क्रांती सेनेत सक्रिय सहभाग घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढला लढा
२५ सप्टेंबर १९३० रोजी दुपारी १२ वाजता चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाला सुरुवात झाली. या आंदोलनासाठी तेव्हा घणसोली गावातून १०० स्वांतत्र्य सैनिक गेले होते. आगरी, कोळी, कराडी, आदिवासी अशा बारा बलुतेदारांपैकी हे आंदोलक होते. सरकारविरोधात आंदोलनकर्त्यांवर इंग्रज सरकारने भादंवि १२०, १४७, १४८, १४९, २४४, ३०२, ३९५ अन्वये खटले भरले. हे खटले तब्बल ७२ दिवस चालले. नऊ आरोपींना सहा महिने, दीड वर्षे व तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. आंदोलनकर्त्यांच्या बाजूने कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब करंदीकर, वामनराव रेगे, भास्करराव दामले आणि सदाशिवराव फडके या नामवंत विधितज्ज्ञांनी काम पाहिले होते.

स्वातंत्र्याच्या लढ्यात घणसोली गावातील स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारकांनी केलेला त्याग, बलिदानाचा इतिहास फार मोठा आहे. गावातील या क्रांतिकारकांच्या त्या पाऊलखुणा काळासोबत नष्टही झाल्यात, पण आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे आमचे कर्तव्य आहे.
- अमृत पाटील, इतिहास संशोधक, नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92672 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..