बोईसर ग्रामपंचायत नगरपालिकेच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसर ग्रामपंचायत नगरपालिकेच्या प्रतीक्षेत
बोईसर ग्रामपंचायत नगरपालिकेच्या प्रतीक्षेत

बोईसर ग्रामपंचायत नगरपालिकेच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

सुमित पाटील : सकाळ वृत्तसेवा
बोईसर, ता. १४ : बोईसरमधील लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने येथे ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत व्हावे, अशी मागणी नागरिक करत आहेत; पण बोईसर नगरपंचायत अस्तित्वात येईल या आशेवर असलेल्या बोईसरवासीयांचा राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे भ्रमनिराश झाला आहे. बोईसर नगरपालिका व्हावी, यासाठी शासनाकडे अनेक वेळा अहवाल सादर करण्यात आले आहेत; मात्र अहवाल मंत्रालयात धूळ खात पडून आहेत.
बोईसरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. बोईसर व लगतच्या ग्रामपंचायतींत वाढत्या नागरीकरणामुळे बोईसरमध्ये शहरीकरण झाले आहे; तर बोईसरजवळ तारापूर औद्योगिक वसाहत असून देशातील पहिले अणुशक्ती केंद्र ही याच भागात आहे. स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींच्या हितसंबंधांमुळे बोईसर ग्रामपंचायत ही नगरपालिका आजतागत होऊ शकली नाही.
बोईसरमध्ये सुसज्ज रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, उद्याने, मैदान, पथदिवे आणि सांडपाणी निचरा असे अनेक सुविधांचा अभाव आहे. तसेच शहरात मैदानासाठी राखीव ठेवलेले भूखंड विकसकांनी गिळंकृत केले आहेत. बोईसर शहर असल्याचे भासवून येथे अनेक गृह प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे बोईसर ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यास या भागात सुविधा देणे शक्य होणार आहे.
बोईसर परिसरात आठ ग्रामपंचायती, तारापूर औद्योगिक वसाहत, अणु ऊर्जा केंद्र अशा आस्थापना आहेत. तसेच येथील ग्रामपंचायतींना वाढत्या लोकसंख्येला सोई-सुविधा पुरविणे आवाक्याबाहेर जात आहे. बोईसर नगरपालिका झाल्यास बोईसर पालघर भागातील विकासाला अधिक गती मिळू शकत असल्याने याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
....
अनेक महत्त्वाचे प्रकल्प
केंद्र सरकारचे ४ ते ५ ड्रीम प्रोजेक्ट या पालघर बोईसर परिसरात आहेत. यात वाढवण बंदर, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस वे, बुलेट ट्रेन आदींचा समावेश आहे.
......
केवळ आश्वासने
१) तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ मध्ये बोईसर येथील जाहीर सभेत नगरपंचायतीचा प्रस्ताव आल्यास तातडीने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.
२) २०१४ नव्याने पालघर जिल्हा निर्मितीनंतर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे बोईसरमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी नगरपालिका होणे अतिशय गरजेचे असल्याचे म्हटले होते. तसेच याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
३) पालघर जिल्हानिर्मितीनंतर बोईसर नगरपालिका होणे आवश्यक असल्याबाबत अनुकूल अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शासनाकडे अहवाल सादर केला होता. तरीही तत्कालीन युती सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही.
४) २०२० मध्ये बोईसर नगर परिषद व्हावी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्हाधिकारी यांना बोईसर मधील शिवसेना पदाधिकारी यांच्यासह निवेदन दिले होते.
....
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजपचे वर्चस्व होते. त्यावेळी अध्यक्षपद हे शिवसेनेकडे होते. तसेच यातच राज्यात सत्तेवर असताना नगरविकास खातेही सेनेकडे होते. नगरविकास मंत्रालय सांभाळले तसेच पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोईसर नगरपालिकेचे स्वप्न पूर्ण करतील का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
....
२०२० मध्ये बोईसर नगरपरिषद व्हावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. नगरपरिषद किंवा नगरपालिका याबाबत मासिक सभेत ठराव मंजूर झालेला आहे. नगरपालिका झाल्यास निधीमध्ये वाढ होऊन विकासकामे जलद गतीने होतील.
- राजेंद्र गावित, खासदार, पालघर

सन १९८८ पासून सरकारने बोईसर येथे स्वतंत्र नगरपरिषद व्हावी म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीने व नागरिकांनीही अनेकदा पाठपुरावा केलेला आहे. तारापूर एमआयडीसीचे क्षेत्र ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळ असल्याने झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे.
- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, बोईसर ग्रामपंचायत

बोईसरची लोकसंख्या वाढत आहे. २०११ च्या तुलनेत येथील लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
- संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते, बोईसर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92704 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..