शहापुरात ताप, सर्दीचे रुग्ण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात ताप, सर्दीचे रुग्ण वाढले
शहापुरात ताप, सर्दीचे रुग्ण वाढले

शहापुरात ताप, सर्दीचे रुग्ण वाढले

sakal_logo
By

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात होत असलेल्या ऊन-पावसामुळे वारंवार वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये तापसदृश आजाराचे दीड हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. तापाबरोबरच पोटदुखी, अतिसाराची रुग्णसंख्याही हजारापार गेली असून, फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी शासकीय रुग्णालयामार्फत घरोघरी तपासणी करण्याची गरज निर्माण झाली असून, रुग्ण संख्येत वाढ होऊ नये व साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भागात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. परिणामी शहापूर तालुक्यात सर्दी, खोकला आणि श्वसनविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता घसरली, तसेच प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे व्हायरल तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात ठिकठिकाणी दुपारी उन्हाचा तडाखा जाणवतो, मध्येच ढग दाटून येतात, मग जोरदार पाऊस, सायंकाळी अचानक हवेत गारठा जाणवू लागतो, नंतर रिमझिम पाऊस! वातावरणातील अशा विचित्र बदलांमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनविकारांचा त्रास असे आजार वाढत आहेत. कान, नाक व घसा विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.
मास्‍क वापरण्‍याचे आवाहन
ग्रामीण, दुर्गम भागात पहाटे असणारा गारवा वातावरणातील आजार पसरवण्यास पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणाचा प्रभाव दोन वर्षांखालील बालकांवर दिसून येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हवेतून पसरणाऱ्या साथीच्या आजारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते; अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यांनी मास्कचा वापर करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टर करीत आहेत.
-------------------------------- --------------------------------//
दैनंदिन तपासणी
तालुक्यातील शहापूर ग्रामीण रुग्णालयात ४०० ते ५०० रुग्णांची, तर खर्डी ग्रामीण रुग्णालयात १५० ते १६० रुग्णांची तपासणी रोज होत आहे. अघई (७५), डोळखांब (८०), कसारा (१६०), किन्हवली (१००), शेंदरून (५०), शेणवा (७०), टाकीपठार (८०), टेंभा (२५) व वासिंद (१२५) या ९ प्राथमिक केंद्रांत रोज रुग्णांची तपासणी होत आहे.
------------------------------------------------/--/-----------
कोट
हवामान बदलामुळे ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढत असून रुग्णांनी न घाबरता आपल्या आजाराचे निदान करून योग्य उपचार करून घ्यावेत व जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या कराव्यात.
- डॉ. तरुलता धानके, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92719 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..