अपहरण झालेल्या मुलीची सुखरुप सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण झालेल्या मुलीची सुखरुप सुटका
अपहरण झालेल्या मुलीची सुखरुप सुटका

अपहरण झालेल्या मुलीची सुखरुप सुटका

sakal_logo
By

वाडा, ता. १३ (बातमीदार) : वाडा शहरातील अशोक वन भागातील सोसायटीत राहणाऱ्या स्वरा शेलार (वय १२) या अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेचा तपास वाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत लावून मुलीची सुखरूप सुटका केली; मात्र अपहरणाचे खरे कारण समजू शकलेले नाही. समीर श्याम ठाकरे (वय ३०) असे मुख्य आरोपीचे नाव असून अन्य दोन आरोपी फसार झाले आहेत.
स्वरा ही मुलगी शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरी येत होती. तिच्या मैत्रिणी घरी गेल्यानंतर स्वरा तिच्या घरी जात असताना सायंकाळी ६ च्या सुमारास दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिचे तोंड दाबून कारमधून मुलीला घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी वाडा पोलिसांनी रात्रभर तपास करून वाडा शहरातील सीसी टीव्ही फुटेज तपासले असता या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद स्विफ्ट कार आढळून आली. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ऐनशेत गावाशेजारी असणाऱ्या शेतघरात आरोपींना अटक करून मुलीची सुरक्षित सुटका केली.
पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व जव्हार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे केला. यात सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, उपनिरीक्षक दीपक ढुस, उपनिरीक्षक समीर लोंढे, उपनिरीक्षक प्रदीप बोधडे, पोलिस नाईक सुशील बांगर, पोलिस शिपाई भूषण खिलारे, गजानन जाधव, सर्फराज तडवी, कमलाकर पाटील व बाबासाहेब घुगे यांच्या पथकाने रात्रभर तपास करून या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. अपहरण केलेल्या आरोपीला वाडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

चौकट
अटक केलेला आरोपी हा वाडा येथे शिकवणी क्लासेस चालवतो; तर अपहरण केलेल्या मुलीचे वडील हे प्राथमिक शिक्षक आहेत. या दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले असून त्यामुळे या मुलीचे अपहरण केले असावे, अशी चर्चा आहे; तर दुसरी बाब म्हणजे टीईटी परीक्षा घोटाळ्याचे लोण वाड्यापर्यंत आले असून याबाबतही प्राथमिक शिक्षक व क्लासचालक यांचे काही लांगेबांधे आहेत की काय, याबाबतची चर्चाही वाडा तालुक्यात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92726 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..