ठाणे खाडीतील पाणथळला नुकताच ‘रामसर स्थळ’ दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane creek gets ramsar status
नऊ पैकी सात निकषांची पूर्तता

ठाणे खाडीतील पाणथळला नुकताच ‘रामसर स्थळ’ दर्जा

मुंबई : ठाणे खाडीतील पाणथळला नुकताच ‘रामसर स्थळ’ दर्जा जाहीर झाला आहे. अशियातील सर्वांत मोठ्या खाडींपैकी एक असलेली ठाणे खाडी काही प्रमाणात मुंबई शहराच्या किनारपट्टीवर वसली आहे. पश्चिम किनारी बृहन्मुंबई जिल्हा; तर पूर्व किनारा ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने आहे. ‘रामसर स्थळ’ दर्जा मिळण्यासाठीच्या नऊ निकषांपैकी ठाणे खाडीने सात निकष पूर्ण केले आहेत. ठाणे खाडीच्या दोन्ही किनारी कांदळवने असून देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटींपैकी २० टक्के प्रजाती येथे आढळतात. ज्यामध्ये १३ खारफुटी प्रजाती असून, ३६ मॅन्ग्रोव्हज अलाईज प्रजाती आहेत. तसेच राखाडी खारफुटीच्या झाडांचा मोठा समूहदेखील येथे आहे. ठाणे खाडी ही मध्य अशियाई स्थलांतर मार्ग (सेंट्रल एशियन फ्लायवे) पाणथळ जागांच्या समूहाचा एक महत्त्वाचा घटक आहे.

दरम्यान, रामसर स्थळ दर्जासाठी ठाणे खाडीने सात निकषांची पूर्तता केली. यातील निकष दोनमध्ये जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रजाती असणे, निकष तीनमध्ये जैवभौगोलिक विविधता राखणे आणि वनस्पती, प्राणी यांना संकटसमयी आधार देणे, निकष चारमध्ये जीवनचक्राच्या गंभीर टप्प्यावर अथवा विपरित परिस्थितीत आधार देणे, निकष पाचमध्ये २० हजारांहून अधिक पाणपक्ष्यांची संख्या, निकष सहामध्ये दुर्मिळ आणि संकटग्रस्त पाणपक्षी प्रजाती, निकष सातमध्ये एत्तदेशीय माशांसाठी योग्य प्रमाणात आधारभूत असणे आणि निकष आठमध्ये माशांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्रोत, अंडी घालण्यासाठी अधिवास, स्थलांतर मार्ग आदी निकषांची पूर्तता ठाणे खाडीने केली आहे.

पाणथळ जागांचे महत्त्व
सतत विस्तारत असलेल्या मुंबई महानगर परिसराचे रक्षण करण्यासाठी पाणथळ जागेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मासेमारीस पूरक स्थानिक रोजगार, भूजलाच्या पुनर्भरणीकरणासाठी जतन आवश्यक आहे. कांदळवने ही जमिनीची धूप कमी करणे, प्रदूषण नियंत्रण, कार्बन सिंक आणि वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.

२०२ प्रजातींचे पक्षी
वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यास सागरी संरक्षित क्षेत्र ठरवले आहे. या खाडी क्षेत्रात २०२ प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी काही संकटग्रस्त प्रजाती आहेत. इतर प्राण्यांमध्ये झूप्लँक्टनच्या २४ प्रजाती, फायटोप्लँक्टनच्या ३५, फुलपाखरांच्या ५९ प्रजाती, किटकांच्या ६७ प्रजाती, १८ प्रजातींचे मासे, क्रस्टेशियन आणि बेंथोसच्या २३ प्रजाती येथे आढळतात.

शहरी भागात असलेली देशातील पहिली ‘रामसर स्थळ’ म्हणून केवळ ठाणे खाडीचे महत्त्व मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या पाणथळ जागांपैकी एक आहे. खाडीला रामसर दर्जा मिळण्याची घोषणा ही खाडीचे संवर्धन आणि शाश्वततेच्या हमीसाठी नागरिकांनादेखील प्रोत्साहित करेल.
- डॉ. अफ्रोज अहमद, तज्ज्ञ सदस्य, राष्ट्रीय हरित लवाद

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92791 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..