कोपरा गावाला पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरा गावाला पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा
कोपरा गावाला पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा

कोपरा गावाला पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा

sakal_logo
By

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : भाईंदर पश्चिम शहरापासून अवघ्या चार ते पाच किमी अंतरावर असलेले कोपरा हे ४५ ते ५० घरे असलेले गाव. एकीकडे मिरा भाईंदर शहरासाठी कोट्यवधी रुपयांचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधण्याचे प्रस्ताव तयार केले जात असताना कोपरा गाव मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यातील चार महिने ग्रामस्थांना चिखल तुडवत जाण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नसतो.
भाईंदर पश्चिमपासून पुढे उत्तनच्या दिशेने गेले, की मोर्वा गावाच्या पलिकडे मिठागरांनंतर एक कच्चा रस्ता डावीकडे दत्त मंदिरच्या दिशेने वळतो. याच रस्त्यावर मुख्य रस्त्यापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर कोपरा गाव आहे. गावात वीज सोडली, तर कोणतीही सुविधा नाही. पक्का रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात तर अवस्था अतिशय बिकट होते. संपूर्ण कच्चा रस्ता चिखलाने भरून जात असल्याने रिक्षाचालकदेखील गावात येण्यास नकार देतात. काही दिवसांपूर्वी गावात मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने रस्त्याची अवस्था पाहून येण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठ्या टेम्पोमधून मृतदेह न्यावा लागला होता, असे ग्रामस्थ सांगतात; तर महापालिकेत नियमितपणे घरपट्टी भरतो; मग आम्हाला पक्का रस्ता का नाही, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
.....
मीठ विभागाकडून परवानगी नाही
वास्तविक काही वर्षांपूर्वी कोपरा गावाचा समावेश असलेल्या उत्तन परिसराचा विकास आराखडा एमएमआरडीएने तयार केला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो महापालिकेकडे हस्तांतर केला. या आराखड्यात दाखवलेला कोपरा गावात जाणारा रस्ता मीठ विभागाच्या जमिनींमधून जात आहे. रस्ताबांधणीसाठी मीठ विभागाकडून परवानगी मिळालेली नसल्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाही.

प्रस्ताव रखडला
आराखड्यातील रस्त्याचे मीठ विभागाच्या जागेत दाखवलेले रेखांकन बदलून ते अन्य जागी स्थलांतर करण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये महासभेत मंजूर करण्यात आला आहे. आराखड्यातील या बदलाला राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्यामुळे फेरबदलाचा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी महापालिकेकडून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला दोन वेळा स्मरणपत्र देण्यात आले आहे. फेरबदलाला मान्यता मिळाली, की रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92831 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..