मूळगाव येथील शिवकालीन श्री खंडोबा देवस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूळगाव येथील शिवकालीन श्री खंडोबा देवस्थान
मूळगाव येथील शिवकालीन श्री खंडोबा देवस्थान

मूळगाव येथील शिवकालीन श्री खंडोबा देवस्थान

sakal_logo
By

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरापासून सुमारे आठ किमी अंतरावर असलेले शिवकालीन, मूळगाव येथील खंडोबाचे प्राचीन देवस्थान हे जागृत देवस्थान समजले जाते. वर्षभर या देवस्थानात भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावणात आजूबाजूच्या गावांतून, शहरातून तर थेट मुंबई भागातूनही भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात.

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील लिंगायत दैवत आहे, महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने गडरिया, वंजारी, धनगर, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोळी, मातंग, माळी, रामोशी (नाईक), वाडवळ, लिंगायत, सोनार समाज, बेलदार, तसेच कित्येक ब्राह्मण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते. प्राचीन परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो.
मूळगावचे हे प्राचीन मंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे ५५५ पायऱ्या आहेत; पण पायऱ्या चढताना आजूबाजूचा विलोभनीय निसर्ग आपल्याला अजिबात थकवा जाणवू देत नाही. मंदिराच्या पायथ्याशी खंडोबाची दुसरी पत्नी बानू हिचे मंदिर आहे. जशा पायऱ्या चढून जाऊ तसा देवाशी एकरूप होत असल्याची भावना निर्माण होते. एका बाजूला बारवी धरण, हिरवाईने नटलेला घनदाट जंगल परिसर आणि दुसऱ्या बाजूला नजरेस पडणारा श्री मलंगगड रोड. दोन डोंगरांच्या मध्ये वसलेले हे गाव, शुद्ध हवा आणि शांतता अनुभवली की मनावरील ताण हलका झाल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्याच ठिकाणी खंडोबा, म्हाळसा आणि बानू अशी तीन शिवलिंगे आहेत. याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून, त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे, परंतु कालांतराने ते बुजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला खंडोबाला दुपारी दोन वाजता हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी पाच वाजता देवाचा लग्न उत्सव असतो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात. महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते; तर माघ महिन्यात येथे मोठी यात्रा असते. विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रम येथे घेतले जातात; परंतु श्रावणात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. यावेळी अनेक भाविक आपल्या आराध्याचे दर्शन घ्यायला येतात. या ठिकाणी यायचे असल्यास, अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी रस्त्यामार्गे व बदलापूर बोराडपाडा मार्गे मूळगावात जाता येते. बारवी धरण रस्त्यामार्गेही खासगी वाहनाने मूळगावात जाता येते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92836 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..