ठाणे ठाणे कारागृह अधिक्षकांना राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे ठाणे कारागृह अधिक्षकांना राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक
ठाणे ठाणे कारागृह अधिक्षकांना राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक

ठाणे ठाणे कारागृह अधिक्षकांना राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ ः ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. कारागृहातील कैद्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासोबतच भविष्यात त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. हा सन्मान त्यांच्या २७ वर्षांच्या सेवेचा असल्याची भावना व्यक्त करत सर्व स्तरांतून अहिरराव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हर्षद अहिरराव हे १९९५ मध्ये कारागृह विभागामध्ये तुरुंगाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले. सेवेत दाखल झाल्यापासून २७ वर्षांच्या कालावधीत येरवडा, नाशिक, नागपूर, मुंबई या अतिसंवदेशनशील मध्यवर्ती कारागृह येथे तुरुंगाधिकारी, उपअधीक्षक या पदांवर त्यांनी सेवा केली. २०१९ पासून ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे ते अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. हर्षद अहिरराव यांनी २०१६ ते २०१९ पर्यंत तीन वर्षे मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले. या कारकिर्दीत त्यांनी दहशतवादी, बॉम्बस्फोटातील आरोपी, कुख्यात गुन्हेगार, इसिस, मोठे गुंड, शहरी नक्षलवादी, २६/११ हल्ल्यातील आरोपी, ९/११ रेल्वे बॉम्बस्फोटातील गुन्हेगार यांना यशस्वीरीत्या हाताळून त्यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवले. कारागृहातील पायाभूत सुविधा वाढवण्यात मोठ्या प्रमाणात कामे केली. अहिरराव यांना कारागृहातील उल्लेखनीय कामगिरीकरिता २०१८ मध्ये अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलेला आहे.
-----------
बंदिवासात परिवर्तनाचा प्रकाश
हर्षद अहिरराव यांनी कारागृहात दाखल कैद्यांची सुधारणा आणि पुनर्वसन करण्याच्या हेतूने विनातारण कर्ज, प्रौढ साक्षरता अभियान/उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केले. कोविड कालावधीत कैद्याच्या नातेवाईकांना सामाजिक संस्थेच्या सहाय्याने रेशन पुरवठा, गरीब व गरजू कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर सामाजिक संस्थेच्या मदतीने मोफत कायदेविषयक सहाय्य मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले. कैद्यांसाठी योगा, मेडिटेशन, वैद्यकीय शिबिरे आयोजित केली. जेवणात सुधारणा होण्यासाठी अ‍ॅटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन, बल्क प्रेशर कुकर, सोलर वॉटर हिटर, जिम, हॉट-पॉट इत्यादी अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात पुढाकार घेतला. तेलंगणा राज्याच्या कार्यरत ‘विद्यादानम’ प्रकल्पाच्या धर्तीवर मागील तीन वर्षांत ३ हजार कैद्यांना साक्षर करून मूलभूत शिक्षण देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92893 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..