मिरा भाईंदर महापालिकेला मिळणार नवे मुख्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदर महापालिकेला मिळणार नवे मुख्यालय
मिरा भाईंदर महापालिकेला मिळणार नवे मुख्यालय

मिरा भाईंदर महापालिकेला मिळणार नवे मुख्यालय

sakal_logo
By

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापलिकेची सध्याची मुख्यालयाची जागा अपुरी पडू लागली असल्यामुळे लवकरच मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतर होणार आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग परिसरात एका मोठ्या गृहसंकुलातील सुविधा भूखंडावर मुख्यालयाची इमारत उभी राहणार असून विकसक ती महापालिकेला टीडीआरच्या बदल्यात मोफत बांधून देणार आहे. येत्या दोन वर्षांत ती बांधून पूर्ण होणार आहे. मात्र नवे प्रस्तावित मुख्यालय शहराबाहेर जाणार असल्याने सामान्य नागरिकांना दूर पडण्याची शक्यता आहे, असा सूर उमटू लागला आहे.
मिरा भाईंदर महापालिकेची सध्याची मुख्यालयाची इमारत २००० मध्ये बांधण्यात आली; परंतु कामाचा व्याप वाढू लागल्यामुळे ही इमारत कमी पडू लागली आहे. परिणामी नगररचना, आरोग्य आदी विभाग मुख्यालयातून अन्य इमारतीत स्थलांतर करावे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी मिरा रोडच्या एस. के. स्टोन भागात नव्या मुख्यालयाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे मुख्यालयदेखील महापालिकेला मोफत बांधून मिळणार होते; परंतु संबंधित जागा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे तो प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यालयाची इमारत एखाद्या विकसकाकडून नाट्यगृहाप्रमाणेच मोफत बांधून घ्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली होती. त्यानुसार मुंबई अहमदाबाद महामार्ग परिसरात जेसल पार्क - घोडबंदर या रस्त्यालगत जेपी इन्फ्रास्ट्रक्चर ही बांधकाम कंपनी त्यांच्या गृहसंकुलात असलेल्या भूखंडावर महापालिकेला टीडीआरच्या बदल्यात मोफत मुख्यालय बांधून देण्यास तयार झाली आहे.
असे असेल मुख्यालय
सुमारे तीन लाख फूट क्षेत्रफळ असलेल्या इमारतीचे संकल्पचित्रही तयार करण्यात आले आहे. या इमारतीत महापालिकेचे सर्व विभाग एकाच छताखाली असतील.
भविष्यात महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या दोनशे इतकी होईल, असे गृहीत धरून त्यासाठी लागणारे सभागृह, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, विविध अधिकारी यांची प्रशस्त दालने या इमारतीत असतील.
सुमारे पाचशे वाहने उभी राहतील, असे सुसज्ज वाहनतळदेखील या ठिकाणी असेल. पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दोन वर्षात इमारत बांधून पूर्ण होईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

भाजपमध्ये नाराजीचा सूर
मुख्यालयाची नवी प्रस्तावित इमारत मूळ शहरापासून बाहेर एका बाजूला असल्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. भाईंदर पश्चिम व पूर्व तसेच उत्तन येथील रहिवाशांना मुख्यालयापर्यंत पोहोचणे त्रासदायक ठरणार आहे. यापेक्षा मिरा रोड येथील शिवार गार्डन भागात महापालिकेचे अडीच एकर जागेवर टाऊन पार्कचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी मुखालयाची इमारत बांधणे महापालिकेला शक्य आहे व ही जागा सर्वांसाठीच मध्यवर्ती ठरेल, असे मत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93189 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..