आद्य राष्ट्रध्वजास देणार मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flag was hosted Madam Cama Germany
पालघरमध्ये आद्य राष्ट्रध्वजास मानवंदना

आद्य राष्ट्रध्वजास देणार मानवंदना

विरार : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्त घरोघरी तिरंगा ही मोहीम केंद्र सरकारच्या आवाहनावरून राबवण्यात आली, पण सध्याच्या तिरंगा ध्वजाचे पूर्वरूप असणाऱ्या भारताच्या आद्य ध्वजाला यंदा ११५ वर्षे पूर्ण होत आहे. हा राष्ट्रध्वज २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीतील सुटगार्ड शहरात जागतिक समाजवादी परिषदेत स्वातंत्र्यसेनानी मादाम कामा यांनी फडकावला होता. त्यानिमित्त पालघर जिल्ह्यात या राष्ट्रध्वजास २५ ऐतिहासिक स्थळांवर मानवंदना देण्यात येणार आहे. किल्ले वसई मोहिमेंतर्गत २० व २१ ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, समस्त दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र, उत्तर कोकण लिपी मंडळ, गडमाची ट्रेकर्स आदी संस्था सहभागी होणार आहेत.

किल्ले वसई मोहिमेंतर्गत गेल्या १६ वर्षांपासून या राष्ट्रध्वजाला विविध ऐतिहासिक स्थळांवर मानवंदना देण्यात येते. यंदाही या मोहिमेचा आरंभ जंजीरे वसई किल्ल्यावरील नरवीर चिमाजी आप्पा स्मारकात २० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता होईल. २० व २१ ऑगस्ट जिल्ह्यातील तब्बल २५ ऐतिहासिक स्थळांवर भारताच्या या आद्य राष्ट्रध्वजाचा जयजयकार करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक स्थळांत गडकोट, मंदिरे, समाध्या, टेहळणी बुरुज, कोट, प्राचीन बंदरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व स्थळी भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन इतिहासाचे मार्गदर्शन करण्यात येईल, तसेच भटकंती करण्यात येईल.

दोन दिवसांत पालघर जिल्ह्यातील एकूण २५ ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी नागरिकांना यामुळे मिळणार आहे. दोन दिवसीय मोहिमेत इतिहास अभ्यासक व किल्ले वसई मोहीम प्रमुख श्रीदत्त राऊत मार्गदर्शन करणार आहेत. यंदा या उपक्रमाच्या उद्‍घाटनात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते योगेश मेहेर, महाराष्ट्र श्री विजेत्या श्रद्धा सुहास ढोके, केंद्रीय पुरातत्व विभागाचे कैलास शिंदे, राजू शांताराम पाटील, रामनाथ लक्ष्मण खुर्दळ या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी उत्तर कोकण लिपी मंडळ महाराष्ट्र अंतर्गत मोडी लिपी अभ्यासक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या ‘आज्ञापत्र उपक्रमा’चे प्रकाशन होईल.

असा आहे ध्वजाचा इतिहास
२२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ड या शहरात जागतिक समाजवादी परिषद भरली होती. त्या ठिकाणी भारताच्या प्रतिनिधी मादाम कामा यांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र असा ध्वज भारताचा ध्वज म्हणून सादर केला. ऑगस्ट १९३७ मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात ध्वजाची मोठी मिरवणूक काढण्यात आली. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्थानक या मार्गावर निघालेल्या या मिरवणुकीत खुद्द स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात सावरकरांचे योगदान होते. हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा साधण्याच्या हेतूने सावरकरांनी ध्वजावर अनुक्रमे सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते. आजही हा ध्वज पुण्यात केसरीवाड्यात ठेवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93227 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..