सिद्धगड परिसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धगड परिसर
सिद्धगड परिसर

सिद्धगड परिसर

sakal_logo
By

मुरलीधर दळवी : सकाळ वृत्तसेवा
मुरबाड : धुक्याची दुलई पांघरलेले सह्याद्रीचे कडे, उंच कातळावरून खाली झेपावत असलेले पांढरेशुभ्र धबधबे व सभोवार पसरलेली हिरवीगार वनराई अशा नयनरम्य वातावरणात पर्यटकांना एखादा दिवस घालवायचा असेल तर मुंबई, कल्याणपासून जवळच असलेले ठिकाण म्हणजे भीमाशंकर अभयारण्य विभागात असलेला सिद्धगड परिसर!
शहरातील उंच इमारती, सततचा गजबजाट व प्रदूषण या सर्वांचा कंटाळा आला असेल तर भीमाशंकर अभयारण्य विभागात असलेल्या सिद्धगड परिसराला एकदा अवश्य भेट द्यावी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र लढा देत असताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल व हुतात्मा वीर हिराजी पाटील यांचे स्मारकसुद्धा येथेच आहे. ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील लोकांचे ते प्रेरणास्थान आहे.
पर्यटकांना ट्रेकिंग करण्याची हौस असेल तर शिवकालीन सिद्धगड किल्ल्यावर चढाई करता येईल. कधी-कधी प्रवासांदरम्यान दुर्मिळ शेकरूचे सुद्धा दर्शन होईल. हुतात्मा स्मारकालगत असलेल्या धबधब्यात मनसोक्त भिजण्‍याचा आनंद घेता येईल. तसेच तेथे उभारलेल्या उंच निरीक्षण मनोऱ्यावर चढून रायगड जिल्ह्यातील परिसराचे दृश्य पाहता येणार आहे.
गुरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा गावातील प्रसिद्ध म्हसोबा (शंकराच्या) मंदिरातील दर्शनाने प्रवासाची सुरुवात होते. पूर्व दिशेला म्हसा धसई या अतिशय चांगल्या डांबरी रस्त्यावर गेले की उजव्या बाजूला वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे भव्य फोटो असलेली कमान दिसते. जांभुर्डे गावाकडे जाणारा या रस्‍त्‍यांवर जांभुर्डे गावाकडे वळल्यावर एक किलोमीटर अंतरावर भीमाशंकर अभयारण्य प्रवेशद्वार लागते.
येथे प्रवेश फी भरावी लागते. या ठिकाणी मोठा तलाव आहे, तेथे फेरफटका मारता येईल. या प्रवेशद्वारापासून अभयारण्य परिसर सुरू होतो. हा रस्ता मात्र दगड-मातीचा कच्चा आहे. पुढे वळण -वळणाने चढत जाणाऱ्या रस्त्यावरून सपाटीवर पोहचले की सिद्धगड किल्ल्याच्या भव्य कड्याचे दर्शन होते, रस्त्यावरून जाताना अधूनमधून माकडांचा आवाज येतो.
----------------------------------
कसे जायचे ?
कल्याणपासून मुरबाडमार्गे ३० किलोमीटर, मुरबाड म्हसापासून १२ किलोमीटर, म्हसा जांभुर्डेपासून चार किलोमीटर, तेथून पुढे सिद्धगड आठ किलोमीटर
नवी मुंबई, पुणे येथून यायचे असल्यास कर्जत, कशेळे, कळंबमार्गे, म्हसा ४३ किलोमीटर अंतरावर सिद्धगड.
नेरळ, कळंबमार्गे म्हसा ३० किलोमीटर