गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद
गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद

गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १७ : दिवसेंदिवस ठाणे शहराच्‍या झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची समस्याही भेडसावू लागली आहे. त्यात ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गावदेवी हे एकमेव मैदान असून, ते गेले चार वर्षे भूमिगत वाहनतळाच्या कामामुळे बंद असल्याने मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यातच यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत, मैदान खुले करण्याची मागणी केली. पावसामुळे मैदान पूर्ववत करण्याचे काम थांबले असून पावसाने उसंत घेताच हे काम हाती घेण्यात येणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे स्थानक परिसरात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्याकडेला बेकायदा वाहने उभी करतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारणीचा निर्णय घेऊन त्याचे काम सुरू केले होते. स्मार्ट सिटी योजनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे; परंतु ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे एकमेव मैदान असून भूमिगत वाहनतळाच्या प्रकल्पामुळे मैदान नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी प्रकल्पास विरोध केला होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. पालिकेने न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात वाहनतळाच्या वरती मैदान विकसित केले जाणार असल्याचे पालिकेने म्हटले होते. दोन वर्षांत या प्रकल्‍पाचे काम पूर्ण होणार असल्याचेही म्हटले होते; परंतु चार ‌वर्षे उलटूनही हे मैदान मुलांना खेळण्यासाठी खुले झालेले नाही.
मैदान पूवर्वत करावे
महेश बेडेकर यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्र दिले आहे. या पत्रात नौपाडा परिसरात मुलांना खेळण्यासाठी गावदेवी मैदान ही एकमेव जागा उपलब्ध होती. त्याठिकाणी भूमिगत वाहनतळ प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे हे मैदान चार वर्षांहून अधिक काळ मुलांसाठी बंद आहे. खूप विलंब झालेला गावदेवी मैदानातील भूमिगत वाहनतळ प्रकल्प त्वरित पूर्ण करावा आणि गावदेवी मैदान पूवर्वत करावे, असे बेडेकर यांनी म्हटले आहे. तसेच गावदेवी मैदान लवकरात लवकर मुलांसाठी व नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी बेडेकर यांनी केली आहे.
...............................
कोट :-
गावदेवी भूमिगत पार्किंगचे काम पूर्ण झाले असून, मैदान पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले होते; परंतु पावसामुळे चिखल होत आहे. त्यामुळे मैदान पूर्ववतचे काम करणे शक्य होत नाही. पाऊस थांबताच हे काम हाती घेऊन लवकरच मैदान खुले केले जाणार आहे.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93373 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..