स्टॉलधारकांना यापुढे व्यवसाय परवाना नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टॉलधारकांना यापुढे व्यवसाय परवाना नाही
स्टॉलधारकांना यापुढे व्यवसाय परवाना नाही

स्टॉलधारकांना यापुढे व्यवसाय परवाना नाही

sakal_logo
By

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात यापुढे कोणत्याही स्टॉलला व्यवसाय परवाना न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात सध्या असलेल्या स्टॉलचे फेरसर्वेक्षण करून जे स्टॉल अधिकृत आहेत, त्यांना केवळ महापालिकेकडून परवानगी दिली जाईल. तसेच त्यांच्याकडून भुईभाडे वसूल केले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर शहरात सध्या २६८ स्टॉलना महापालिकेकडून व्यवसाय परवाने देण्यात आले आहे. यात दिव्यांगांना देण्यात आलेले टेलिफोन बुथ, आरे सरिता दुध केंद्र, गटई कामगार व इतर स्टॉलचा समावेश आहे. यातील बहुतांश स्टॉलच्या परवान्यांची मुदत संपली आहे. अशा स्टॉलधारकांनी परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे; तर अनेक नव्या स्टॉलसाठी परवाना मागणी करणारे अर्ज महापालिकेच्या दफ्तरी जमा झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून स्टॉल परवान्यांचे नूतनीकरण व नवे परवाने देण्याचे महापालिकेने बंद केले. त्यामुळे हे परवाने लवकरात लवकर देण्याची स्टॉलधारकांच्या संघटनेने महापालिकेकडे मागणी केली आहे. यामुळे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन स्टॉल परवान्यासंदर्भात धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणीचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने बैठक घेऊन स्टॉलबाबतचे धोरण निश्चित केले.
.....
यामुळे फक्त परवानगी
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात व्यवसाय परवाना कोणाला द्यावा, याबाबतचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार पक्क्या इमारतीत व्यवसाय करणाऱ्यालाच विक्रीसाठी परवाना देण्याचे नमूद आहे. स्टॉलधारक पक्क्या इमारतीत नसल्यामुळे त्यांना व्यवसाय परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. यापुढे स्टॉलना महापालिकेकडून कागदपत्रांची तपासणी करून केवळ परवानगी दिली जाईल व त्यांच्याकडून भुईभाडे वसूल करण्यात येणार आहे.

कागदपत्रांच्या छाननीनंतरच परवानगी
याआधी परवाना दिलेल्या २६८ स्टॉलची यादी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी स्टॉलचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडे असलेल्या परवान्यांची तपासणी करणार आहेत. ज्या स्टॉलना ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या काळात परवानगी देण्यात आली आहे. त्यांची परवानगी कागदपत्रे तपासून कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच्या काळातील स्टॉलधारकांना मात्र परवानगी घेण्यासाठी हयातीचा दाखला, अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करावी लागणार आहेत. या कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच त्यांना स्टॉलसाठी परवानगी दिली जाईल व त्यांच्याकडून महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार भुईभाडे आकारले जाईल, असे संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93389 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..