उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघातसत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघातसत्र
उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघातसत्र

उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघातसत्र

sakal_logo
By

मनोर, ता. १७ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर अपघातसत्र सुरूच आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे मंगळवारी (ता. १६) महामार्गावर चार अपघात झाले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई मार्गिकेवरील खड्ड्यांमध्ये आदळून भरधाव वेगातील जीपचा टायर फुटल्याने अपघात झाला; मात्र आज सकाळपासून महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दुर्वेस उड्डाणपुलाच्या मुंबई मार्गिकेवरील खड्ड्यांमध्ये आढळल्याने भरधाव वेगातील जिपचा (क्र. एमएच ४८ सीसी ०६०३) टायर फुटला. या जिपने उजव्या बाजूने जात असलेल्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी मनोरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला असून वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी दुर्वेस उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित झालेल्या ट्रकने दुभाजक ओलांडून धडक दिल्याने क्रूड ऑईलचा टँकर पुलावरून खाली पडला होता. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये भरधाव वेगातील वाहने आदळून टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाल्याने मंगळवारी (ता. १६) सकाळपासून दुर्वेस ते ढेकाळे गावच्या हद्दीत चार अपघात झाल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम
महामार्गावरील खड्डे आणि अपघातांबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाली आहेत. या बातम्यांची दखल घेत महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली. दुर्वेस गावच्या हद्दीतील वैतरणा पूल, उड्डाणपूल आणि महामार्ग पोलिस केंद्रासमोरचे खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यानंतर हालोली आणि अन्य ठिकाणचे खड्डे बुजवले जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

दुर्वेस गावातील उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत होऊनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. महामार्गावर मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्‍न आहे.
- प्रसाद साखरे, वाहनचालक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93404 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..