गोविंदांच्या हंडीत आता विम्याचे संरक्षण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोविंदांच्या हंडीत आता विम्याचे संरक्षण!
गोविंदांच्या हंडीत आता विम्याचे संरक्षण!

गोविंदांच्या हंडीत आता विम्याचे संरक्षण!

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : अवघ्या काही दिवसांवर दहीहंडी उत्सव येऊन ठेपला असतानाही अनेक गोविंदा पथके विम्याबाबत उदासीन असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने १२ आॅगस्ट रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यातील गोविंदांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांचे आभार मानले आहेत. गोविंदांचा सरावही जोरात सुरू असून सुरक्षेचे सर्व नियम पाळून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी आता आयोजकांची आहे.

यंदा दोन वर्षांनी दहीहंडी उत्सव साजरा होणार असल्याने सर्वत्र जल्लोष आहे. मुंबई-ठाण्यासह पूर्व व पश्मिच उपनगरांत मोठ्या उत्साहात आयोजनाची तयारी सुरू आहे. गोविंदा पथकांचा सरावही अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. गोविंदा पथकांना विमा काढणे बंधनकारक आहे. न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. मात्र, तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. विम्याशिवायच त्यांचा सराव सुरू होता. त्यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने सर्वप्रथन प्रकशित केले. आता एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याची घोषणा केल्याने मंडळांना दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी दहीहंडी समन्वय समितीकडून पाठपुरावा केला जात होता. त्यासाठी माध्यमाचे मोठे सहकार्य लाभले. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच मिळाल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार. भविष्यात असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. आवश्यक सुरक्षा घेऊनच उत्सव साजरा होईल.
- बाळा पेडणेकर अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती

२०१८ पासून राज्य सरकारने गोविंदांना विमा संरक्षण द्यायला हवेत होते; परंतु तसे झाले नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सर्वप्रथम गोविंदा पथकांतील तरुणांवरील कोरोना काळातील किरकोळ गुन्हे मागे घेतले. आता राज्यातील गोविंदांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले, त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो.
- संदीप ढवळे, प्रशिक्षक, जय जवान गोविंदा पथक

गोविंदांचा विमा आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील समस्या ‘सकाळ’ने मांडल्या. त्याबद्दल त्यांचे आभार. खऱ्या अर्थाने यंदा राज्यातील गोविंदांना विमा संरक्षण देऊन त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने दिलासा दिला आहे. आता आयोजकांनीसुद्धा गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
- मोहन शेडगे, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, भायखळा

कोरोना संसर्गामुळे दोन वर्षांपासून दहीहंडी उत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे अनेक गोविंदांचा सराव सुटला आहे. आता निर्बंध हटवण्यात आल्याने गोविंदा पथक जय्यत तयारीला लागले आहे. सरकारने गोविंदांचा विमा अगोदरच काढायला हवा होता. अवघ्या दोन दिवसांवर उत्सव येऊन ठेपला असताना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्यामुळे विमा काढण्यासाठी थोडी धावपळ होत आहे; तरीही मुख्यमंत्र्यांचे आभार.
- सुरेंद्र पाटील, सचिव, यंग उमरखाडी गोविंदा पथक

दोन वर्षांनी दहीहंडी उत्सव होत असल्याने सर्व गोविंदा पथके आनंदात आहेत. त्यात आता विमा संरक्षणाची भर पडली आहे. दहा लाखांच्या विम्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे; तरीही सर्व गोविदांना पथकांना माझी विनंती आहे, की मानवी थर रचताना सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्या.
- विष्णू शिवकर, अध्यक्ष, दत्तनगर गोविंदा पथक, सुमन नगर, चेंबूर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93412 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..