स्वातंत्र्य सैनिकांचे मानधन पाच महिन्यापासून रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money
स्वातंत्र्य सैनिकांचे मानधन पाच महिन्यापासून रखडले

स्वातंत्र्य सैनिकांचे मानधन पाच महिन्यापासून रखडले

जव्हार - देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे गेल्या पाच महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीला आर्थिक चणचण भासत असल्याची खेदजनक परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे जव्हार तहसीलदार कार्यालयाकडून पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मानधनाची मागणी केली आहे.

जव्हार शहरातील एकूण १० स्वातंत्र्यसैनिकांचा व त्यांचे वारस म्हणून असणाऱ्या त्यांच्या विधवा पत्नींना तहसील कार्यालयातून मानधन दिले जात होते. मात्र १० पैकी ८ स्वातंत्र्यसैनिकांचा व त्यांच्या विधवा पत्नीचा मृत्यू झाला आहे. आता केवळ २ स्वातंत्र्यसैनिक रवींद्र वैद्य व दिवंगत सदाशिव घोलप यांच्या पत्नी रेणुका घोलप यांना शासनाकडून मानधन देण्यात येत आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीला पेन्शन योजनेतून मानधन देण्यात येते. पण गेल्या पाच महिन्यांपासून मानधन खात्यात जमा झालेले नाही.

रेणुका सदाशिव घोलप स्वातंत्र्यसैनिक सदाशिव घोलप यांच्या पत्नी असून मार्च महिन्यात पेन्शन घेण्यासाठी जव्हार शहरातील स्टेट बँकेत गेल्या असता पेन्शन जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाच महिने उलटल्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्या स्टेट बँकेत गेल्यानंतर पेन्शन जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या जव्हार येथील तहसीलदार यांच्या कार्यालयात गेल्यानंतर मानधन जमा झाले नसल्याबाबत विचारणा केली. तेव्हा तहसीलदारांनी पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मानधनाबाबत पत्र लिहून मागणी केली आहे. पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, मार्च महिन्यापासून ग्रँड उपलब्ध झाली नसल्याने स्वातंत्र्यसैनिक आणि कुटुंबीयांचे पेन्शन जमा झालेले नाही.

माझे वय ७५ वर्षें आहे. स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या स्वतःचा औषध किंवा दवाखान्याचा खर्च अथवा कुठे जाणे-येणे याकरिता लागणारा खर्च पेन्शनमधून होतो; परंतु पाच महिन्यांपासून पेन्शन बंद असल्याने यंदाच्या वर्षी साजरा करण्यात आलेला देशाचा अमृतमहोत्सव हा आमच्यासाठी दुजाभाव करणारा आहे, असे रेणुका घोलप यांनी सांगितले.

माझ्या पतीने देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशसेवेसाठी योगदान दिले; परंतु तहसील कार्यालयातून देण्यात येणारे मानधन गेल्या पाच महिन्यांपासून देण्यात आले नसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण जाणवत आहे.

- रेणुका सदाशिव घोलप, स्वातंत्र्यसैनिक पत्नी

स्वातंत्र्यसैनिक मानधन गेल्या काही महिन्यांपासून जमा झाले नसल्याने जव्हार तहसील कार्यालयाने याबाबत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

- आशा तामखडे, तहसीलदार, जव्हार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93496 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CollectorsalaryTahsildar