मुंबईला मलेरियाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवताप, मलेरिया
मुंबईला मलेरियाचा धोका

मुंबईला मलेरियाचा धोका

मुंबई : डॉ. रोनल्ड रॉस यांच्या स्मरणार्थ दर वर्षी २० ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिवस म्हणून जगभर पाळला जातो. या दिवशी १९८७ मध्ये रोनाल्ड रॉस यांनी संक्रमण झालेल्या मादी मच्छर चावल्यामुळे मलेरिया होतो, याचा शोध लावला होता. सर्वांत आधी रोनाल्ड यांनी मच्छरांपासून होणाऱ्या रोगांचा शोध लावला. आपण मच्छरांपासून सावध राहायला हवे आणि त्यासाठी नागरिकांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करतात. त्यातच मुंबईला मलेरिया आजाराचा धोका सर्वाधिक असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते.

डास व आजारांचे प्रकार :
मलेरिया हा आजार एनोफिलीस या डासांमुळे होतो. जून महिन्यापासून मलेरियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. डेंगी हा आजार एडिस डासामुळे पसरतो व साधारणत: ऑगस्ट महिन्यापासून डेंगीचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. चिकनगुनिया हा आजार एडिस डासामुळे होतो. या आजाराचे रुग्ण ही आता मुंबईत आढळू लागले आहेत. फायलेरिया हा आजार क्युलेक्स डासामुळे होतो. या डासाची प्रजाती मुंबईत आढळत नाही. हा आजार मुंबईत आढळत नाही.
सात वर्षांची आकडेवारी :
वर्ष २०१६ २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२ (ऑगस्टपर्यंत)
मलेरिया ५८४ ६०१९ ५०५१ ४३५७ ५०१५ ५१७२ २२१८
डेंगी ११८० ११३४ १००३ ९२० १२९ २२१ १२९
चिकनगुनिया ८० ०९

पालिकेच्या उपाययोजना :
महापालिकेच्या कीटकनाशक खात्याकडून साप्ताहिक अळीनाशक कार्यक्रम घेतला जातो. जवळपास ३२०० इमारत बांधकामांच्या परिसरातही प्रत्येक सातव्या दिवशी साचलेल्या पाण्यात डास अळीनाशक फवारणी केली जाते. तसेच २२७ प्रभागांमध्ये धूरफवारणी केली जाते. मोठ्या गाड्यांमधूनही झोन १ ते झोन ७ पर्यंत धूरफवारणी केली जाते. जानेवारी २०२२ पासून ते १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान डासांची अनेक उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. मलेरियाची एकूण ३,१४,५६१ ठिकाणे तपासण्यात आली. त्यात विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव यांचा समावेश होता. त्यापैकी ७,२०९ ठिकाणी एनोफिलीस डासांची उत्पत्तीस्थाने आढळली जी नष्ट करण्यात आली आहेत.
पाणी साचू देऊ नका :
डेंगीबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंगी विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ''एडीस इजिप्टाय’ डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली होती. सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, डेंगी विषाणूवाहक डासांच्या अळ्या घरपरिसरात विविध ठिकाणी साचलेल्या अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांनी स्वतः जबाबदारी स्वीकारून पाणी साचणार नाही, याची खात्री करावी, असे आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93570 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsMumbai