वसईत सहलीचा बेत आखत असला तर सावधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत सहलीचा बेत आखत असला तर सावधान
वसईत सहलीचा बेत आखत असला तर सावधान

वसईत सहलीचा बेत आखत असला तर सावधान

sakal_logo
By

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २० :
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटण्यासाठी वसई तालुक्यातील पर्यटन स्थळांना पसंती दिली जाते. धबधबे, धरणे, समुद्रकिनारे आकर्षित करत असतात; परंतु पर्यटकांची जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ ने प्रतिबंधात्मक आदेशानुसार कलम १४४ लागू केले आहे. तसेच जी क्षेत्र प्रतिबंधात्मक म्हणून जाहीर केली आहेत, त्या ठिकाणच्या सभोवताली १ किमी अंतरावर १ सप्टेंबरपर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, तसेच समुदकिनारी खोल पोहण्यास, तसेच धबधब्याच्या उगमस्थानी, पाण्याच्या प्रवाहात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचबरोबर धबधब्याच्या काठावर, वळणांवर चित्रीकरण करण्यासही परवानगी नसणार आहे. पर्यटन स्थळावर जर मद्यपान, मद्य वाहतूक, अनधिकृत मद्यविक्री करताना कोणी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
नदी, धबधबे, समुद्रकिनारे आदी पर्यटन स्थळांवर, तसेच सार्वजनिक ठिकाणी जलप्रदूषण व ध्वनिप्रदूषण करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाप्रमाणे १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी काढले. याबाबतचे पत्र तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे.

-----------------
प्रदूषणाला रोख
प्रतिबंधात्मक आदेश लागू करतानाच पोलिस आयुक्तालयाने प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी जर खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकचे साहित्य, थर्माकोल उघड्यावर फेकण्यास मनाई करण्यात आली आहे. असे करताना कोणी आढळले तर कारवाई करण्यात येणार आहे. मोठ्या आवाजात गाणी लावणे, डीजे, गाडीमधील स्पीकर वाजविण्याऱ्यांना रोखले जाणार आहे.
-----------------
प्रतिबंधात्मक क्षेत्र
वसई तालुक्यातील टकमक किल्ला, शिवणसई येथील ईश्वरपुरी, उसगाव ते सदानंद आश्रमाकडे जाणारे धबधबे, तसेच कळंब, अर्नाळा, नवापूर, राजोडी व मामाची वाडी येथील समुद्रकिनारे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.