५० थर लावून मोठी हंडी फोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५० थर लावून मोठी हंडी फोडली
५० थर लावून मोठी हंडी फोडली

५० थर लावून मोठी हंडी फोडली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ ः दीड महिन्यांपूर्वी ५० थर लावून दहीहंडी फोडली. आताही हे थर वाढतच राहतील, असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सत्तांतरावर मिश्किल टिप्पणी केली. ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या वेळी ते बोलत होते.

गोविंदा पथकाची मागणी मान्य करण्यात आली आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी प्रो-गोविंदा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचे काम आनंद दिघे यांनी सुरू केले, ते आजही सुरु आहे. टेंभी नाका येथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. ते अरुणाताईंनी बोलून दाखवले होते, असेही शिंदे म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, याचा उच्चारही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला. गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्यांचे पैसे माफ केले. ते विघ्न विघ्नहर्त्याने नाहीसे केले. फक्त काळजी घेऊन सण साजरे करू या, असे आवाहन शिंदे यांनी केले.

दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे टेंभी नाक्यावर आगमन झाले. त्यानंतर थेट स्टेजवर न जाता ते आनंद आश्रम येथे गेले. तिथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा सत्कार केला.
...........................
हे सरकार गोविंदाचे
हे सरकार केवळ शेतकरी, कामगार यांचे नाही, तर आता गोविंदाचेही आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मला आजही मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत नाही. मीही तुमच्यातीलच आहे, असेच मला वाटते, असेही शिंदे म्हणाले.
................
श्रद्धा कपूरने साधला मराठीत संवाद
अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी कसे काय ठाणेकर... असे म्हणत मराठीत बोलायला सुरुवात केली. त्यांनी उपस्थित सर्वांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे आपल्यासोबत असताना आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, असेही श्रद्धा म्हणाल्या. त्यांनी मराठीत संवाद साधल्यामुळे उपस्थित खूश झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93648 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..