बेस्टकडून लवकरच वॉटर टॅक्सीचा पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Taxi
बेस्टकडून लवकरच वॉटर टॅक्सीचा पर्याय

बेस्टकडून लवकरच वॉटर टॅक्सीचा पर्याय

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नुकतीच नव्याने इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल झाली आहे. आता बेस्ट उपक्रम येत्या काळात मुंबई महानगर क्षेत्रासाठी वॉटर टॅक्सीची सेवाही उपलब्ध करून देणार आहे. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय सुलभ आणि गतिमान अशा स्वरूपाची सेवा या टॅक्सीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते, असा बेस्ट उपक्रमाचा विश्वास आहे.
मुंबईतून कोणत्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सेवा देता येईल, यासाठीचा अभ्यास करण्यासाठी बेस्ट उपक्रम लवकरच याबाबतचा अभ्यास करणार आहे. याआधीची बेस्टची मुंबईतील

जलवाहतुकीची सेवा २००२ साली बंद झाली होती. मुंबईत वीस वर्षांपूर्वीही बेस्ट उपक्रम आणि मुंबई महापालिकेकडून जलवाहतुकीचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येत होता; परंतु काही कारणास्तव ही सेवा बंद झाली. आता पुन्हा एकदा अशी सेवा देण्यासाठी आमच्याकडून पुढाकार घेण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुंबईत वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करण्यासाठी बेस्ट उपक्रम येत्या दिवसांमध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. त्यानंतरच हा प्रकल्प राबवण्याबाबतची पुढील रणनीती ठरेल, असेही ते म्हणाले.

नितीन गडकरी यांची सूचना
मुंबईत वॉटर टॅक्सीसाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. बेस्ट उपक्रमाला वॉटर टॅक्सीची सेवा सुरू करणे शक्य आहे. मुंबईपासून नजीकच्या म्हणजे १५ मिनिटांच्या अंतरावर आणि १०० सीटरची वॉटर टॅक्सीची सेवा देणे बेस्ट उपक्रमाला शक्य आहे. त्या अनुषंगाने बेस्टने या सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

जलसेवेचा इतिहास
मुंबईत मालाड मनोरीच्या स्थानिक जनतेच्या मागणीमुळेच मुंबई महापालिकेच्या साह्याने बेस्ट उपक्रमाने १९८१ साली जलवाहतूक सुरू केली होती. मनोरी खाडीत मार्वे ते मनोरी या जलमार्गासाठी ही सेवा सुरू झाली होती. या सेवेसाठी बेस्टने १६ लाख किमतीच्या अत्याधुनिक नौका आणल्या होत्या. त्याआधी १९५८ पर्यंत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते उरण, रेवस, धरमतर या ठिकाणी लाँच सेवा देण्यात येत होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93656 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..