एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime News
एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा

एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा

नवी मुंबई : एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये राहणाऱ्या रमायण ललसा ऊर्फ गुरुदेव ऊर्फ बाबा (४३) याची हत्या करून फरारी झालेल्या अरुणकुमार भारतीला (३२) एपीएमसी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली. दारू पिऊन आल्याने चारचौघांमध्ये ओरडल्याच्या रागातून रमायण याची डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील मृत रमायण ललसा ऊर्फ गुरुदेव हा एपीएमसीतील भाजी मार्केटमधील डी-५५१ गाळ्यामध्ये वरच्या मजल्यावर राहत होता. भाजीविक्रीचा त्याचा व्यवसाय होता. गेल्या रविवारी सकाळी रमायण ललसा राहत असलेल्या गाळ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास एपीएमसी पोलिसांकडून केला जात आहे.

रमायण ललसा याच्या डोक्यामध्ये कोणत्या तरी वस्तूने जोरदार प्रहार करून त्यांची हत्या केल्याची तपासात उघड झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी तीन पथके नेमली होती. या वेळी पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची चौकशीतून या प्रकारानंतर मृत रमायण याच्यासोबत राहत असणारा अरुणकुमार भारती हा मागील महिन्याभरापासून फरारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलिस निरीक्षक वसीम शेख, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेवाळे, काटे, पोलिस हवालदार चंद्रकांत कदम यांचा समावेश असलेल्या पथकाने उत्तर प्रदेशमधील गौंडा जिल्ह्यातील औरव्हा गावात जाऊन आरोपीला अटक केली आहे.

अरुणकुमारला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज नशेमध्ये जोरजोरात आरडाओरड करत होता. रमायण हा धार्मिक स्वभावाचा असल्याने अरुण कुमारचे दारू पिऊन येणे त्याला आवडत नव्हते. त्यामुळे रमायण याने अरुणकुमारला दारु पिऊन गाळ्यावर येण्यास मज्जाव केला होता. यातूनच शनिवारी मध्यरात्री दोघांमध्ये झालेल्या वादावादीतून अरुणकुमार याने रमायण याच्या डोक्यामध्ये पेव्हर ब्लॉक मारून त्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.