मुंबईकरांची रोरो बोटीला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांची रोरो बोटीला पसंती
मुंबईकरांची रोरो बोटीला पसंती

मुंबईकरांची रोरो बोटीला पसंती

sakal_logo
By

रो-रो बोटीला मुंबईकरांची पसंती

अशी आहेत वैशिष्ट्ये
एका वर्षात सहा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांसह वाहनाची वाहतूक
पहिल्या रो-रो बोटीमुळे दीड कोटीचे उत्पन्न
लवकरच काशीदसाठी दुसरी बोट
--

मार्च २०२० मध्ये भाऊचा धक्का ते मांडवादरम्‍यान रो-रो बोट सेवा सुरू झाली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती ठप्प पडली. गेल्या वर्षापासून ती पुन्हा सुरू झाली आणि तीही अगदी जोमात. तेव्हापासून आतापर्यंत एका रो-रो बोटीने तब्बल ६ लाख ४४ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांसह वाहनांची वाहतूक केली. तब्बल १ कोटी ३७ लाख ८५ हजारांचा महसूल गोळा केला. विशेष म्हणजे दिवसेंदिवस रो-रो बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे.

नितीन बिनेकर, मुंबई
सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनाऱ्यांचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली होती. त्यानुसार भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो बोट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात १५ मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्गाच्या सावटाखाली बोट सेवा सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि खबरदारीमुळे ती बंद करावी लागली. गेल्या वर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने पुन्हा सुरू झालेल्या रो-रो सेवेला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. २०२१-२२ मध्ये मुंबई ते माडवादरम्यान रो-रो बोटीतून ५१ लाख १ हजार ४६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ८१ लाख १ हजार ५१६ रुपयांचा महसूल मिळाला. याच कालावधीत एक लाख २८ हजार ९४५ जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक बोटीतून केली गेली. त्यामधूनही ५६ लाख ८३ हजारांचा महसूल गोळा झाला. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आता दुसरी रो-रो बोट आणण्याचा प्रयत्न सागरी महामंडळाकडून करण्यात येत आहे.
मुंबई ते मांडवापर्यंत अंतर रस्ते मार्गाने १११ किलोमीटर आहे. वाहनाने ते पार करण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात. त्यात प्रवाशांचा प्रचंड वेळ वाया जात होता. मात्र, वाहतूक कोंडीवर मार्ग काढत रो-रो बोटीतून साधारण ६० मिनिटांत मुंबईहून आपल्या वाहनासह मांडवा गाठता येते. रो-रो बोटीतून समुद्रमार्गे १९ किमी प्रवास करताना प्रवाशांना आपल्या वाहनासह समुद्रसफारीचाही आनंद घेता येते.

ग्राफिक्स
रो-रो बोटीची वैशिष्ट्ये
- एकाच वेळी नेता येणारी वाहने ः १४५
- प्रवासी क्षमता ः ५००
- मुंबई ते मांडवा प्रवास ः ४६ मिनिटे
- सर्व प्रकारची वाहने घेऊन जाण्याची क्षमता
- पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र कक्ष

२०२१-२२ मध्ये रो-रो बोटीतून झालेली प्रवासी वाहतूक
- आऊट डेक ः ४ लाख १३ हजार ३१३
- इनडोअर डेक ः ९६ हजार ४१२
- व्हीआयपी कक्ष ः १ हजार ३२१
- खासगी चारचाकी वाहन ः ८६ हजार ६४४
- मालवाहू वाहन ः ९ हजार ७०५
- प्रवासी बस ः ६४
- मोटरसायकल ः ३० हजार ६८४
- सायकल ः १ हजार १५०
- पाळीव प्राणी ः ४ हजार ७९३

प्रवासी वाहतूक महसूल ः ८१ लाख १ हजार ५१५
वाहन आणि इतर वाहतूक महसूल ः ५६ लाख ८३ हजार ९०५
एकूण महसूल ः १ कोटी ३७ लाख ८५ हजार

तिकीट दर
प्रति-प्रवासी ः ४०० रुपयांपासून
पाळीव प्राणी ः ३१० रुपयांपासून
सायकल ः ११० रु.
दुचाकी ः २१० रु.
चारचाकी ः १०२० रु.
प्रवासी वाहन ः ३३०० रु.

लवकरच दुसरी रो-रो बोट
भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवेनंतर आता दुसरी बोट मुंबई ते काशीददरम्यान धावणार आहेत. त्यासाठी काशीद बंदरावर जेट्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षअखेरीस ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईहून काशीदला पोहचण्यासाठी अलिबागमार्गे रस्त्यानेच जावे लागते. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवासात तब्बल ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने पर्यटक काशीदला जाणे टाळतात. आता रो-रो बोटीमुळे सागरी मार्गाने जाण्याकरिता फक्त दोन तास लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळही वाचणार आहे. बोटसेवेमुळे काशीद आणि परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.