बेस्ट ग्राहक सेवेचा डिजिटल कनेक्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्ट ग्राहक सेवेचा डिजिटल कनेक्ट
बेस्ट ग्राहक सेवेचा डिजिटल कनेक्ट

बेस्ट ग्राहक सेवेचा डिजिटल कनेक्ट

sakal_logo
By

ग्राहक सेवेचा ‘बेस्ट’ डिजिटल कनेक्ट 

मुंबईकरांना स्वस्त दरात प्रवास घडवणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता आपल्या सेवेत डिजिटल पर्यायांचा अधिकाधिक समावेश केला आहे. वाहतूक उपक्रम असो की बससेवा, दोन्हीमध्ये होत असलेले डिजिटायजेशन भविष्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. त्या अनुषंगानेच बेस्ट उपक्रमाने सगळ्या सेवा अधिकाधिक डिजिटल कशा होतील यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्राहक सेवेचा ‘बेस्ट’ डिजिटल कनेक्ट प्रवाशांना नक्कीच दिलासादायक ठरेल.

किरण कारंडे, मुंबई
मुंबईतील प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बससेवेने नुकतेच अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले. सेवा क्षेत्रामध्ये ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल पर्याय देतानाच त्यांच्या गरजाही बेस्टने ओळखल्या आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाकडून राबविण्यात येणारे प्रकल्प डिजिटल पुढाकाराचाच भाग आहेत. मुंबईत प्रवासाच्या विविध पर्यायांमुळेच बेस्टची प्रवासी संख्या २२ लाख ५० हजारांवरून ३५ लाखांवर गेली आहे.

पथदिव्यांसाठी पथदीप ॲप
मुंबईतील क्वीन नेकलेसला झळाळी देण्यापासून धारावीतील अगदी गल्लीबोळातील चाळीत पथदिव्यांचा प्रकाश पोहचण्यासाठी बेस्ट उपक्रमाचा विद्युत पुरवठा विभाग कार्यरत आहे. मुंबईत तब्बल ४३ हजार पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम बेस्ट उपक्रमाकडे आहे. अनेकदा दिवसा पथदिवे सुरू असतात. काही बंद पडतात. काही दिवे सातत्याने चालू-बंद होत असतात. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात; परंतु आता त्यांना ऑनलाईन पर्यायाची जोड मिळणार आहे. स्वयंचलित पथ प्रकाश योजना व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत सगळी पथदिव्यांची यंत्रणा आता ‘ऑटोमेटेड’ करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणच्या पथदिव्याची तक्रार आल्यानंतर तिचे रिअल टाईम ट्रॅकिंग करणे शक्य झाले आहे. पथदीप ॲपच्या माध्यमातून ग्राहकांनाही पथदिव्यांची तक्रार करता येईल. आपल्या तक्रारीचे ऑनलाईन ट्रॅकिंग करण्याचाही पर्याय असणार आहे. 

आरामदायी प्रीमियम सिटी बससेवा
बेस्टने नुकतीच प्रीमियम सिटी बससेवा लाँच केली. या सेवेतही तंत्रज्ञानाचा मोठा भाग आहे. सर्व बस वातानुकूलित आणि प्रवाशांना आसनाची हमी देणाऱ्या आहेत. ‘चलो ॲप’च्या माध्यमातून प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासह आपली सीट बुक करण्याचा पर्याय असणार आहे. सरासरी चार रुपये प्रतिकिमी असा दर प्रीमियम बससाठी आकारण्यात येणार आहे. लांबच्या प्रवासासाठी आसन व्यवस्थेत हेडरेस्ट विंग्ज आणि अॅडजेस्टेबल  फुटरेस्टची व्यवस्था सेवेअंतर्गत करण्यात आली आहे. मर्यादित थांब्यासह एक्स्प्रेस सेवा देणाऱ्या बस सप्टेंबरपासून सुरू होतील. 

‘टॅप इन टॅप आऊट’चा पर्याय 
ग्राहकांना डिजिटल बससेवेचा पर्याय देण्याच्या उद्दिष्टानेच भारतातील पहिल्या एनसीएमसी कार्डची अंमलबजावणी बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आली आहे. बेस्टसह रेल्वे आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक उपक्रमांसाठी हे कार्ड वापरता येणार आहे. डिजिटल बसची संख्या वाढवण्यासाठीही बेस्ट सध्या प्रयत्नशील आहे. सेल्फ टॅप इन टॅप आऊट म्हणजे कोणताही मानवी हस्तक्षेप नसणाऱ्या अशा १०० डिजिटल बस बेस्टने आपल्या ताफ्यात घेतल्या आहेत. त्यामुळे बस वाहकाच्या मदतीशिवाय फक्त कार्डच्या आधारे प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना टॅप करून प्रवास पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. 

चलो ॲप 
बेस्टच्या ‘चलो ॲप’ सुविधेमुळे उपक्रमाचा चांगलाच फायदा होत आहे. तिकिटासाठीच्या कागदाची किंमत आणि रोख रकमेची हाताळणी अशा दोन्ही गोष्टींमध्ये वेळ आणि पैशांची बचत होत आहे. सध्या बेस्टच्या २५ लाख प्रवाशांनी ‘चलो ॲप’ डाऊनलोड केले आहे. दर महिन्याला सव्वा कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल तिकिटे काढली जातात. 

‘ई स्कूटर’चा प्रायोगिक प्रकल्प 
डिजिटायजेशनसोबतच बेस्ट उपक्रमाकडून येत्या काळात वाहतुकीसाठी स्कूटरचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बस स्टॉपवर ‘ई स्कूटर’चा पर्यायही नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे. अशा प्रायोगिक प्रकल्पाची सुरुवात सध्या अंधेरीमध्ये झाली असून त्यासाठी प्रवाशांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. बेस्ट उपक्रमाने येत्या काही दिवसांमध्ये वॉटर टॅक्सीसारखा पर्याय देण्याच्या उद्देशानेच सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार करण्याचे निश्चित केले आहे.