मुंबईत २६/११ हल्ल्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत २६/११ हल्ल्याची धमकी
मुंबईत २६/११ हल्ल्याची धमकी

मुंबईत २६/११ हल्ल्याची धमकी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक शाखेला आल्याने तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. शुक्रवारी (ता. १९) रात्री पावणेबाराच्या सुमारास पाकिस्तानी क्रमांकावरून आलेल्या या संदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असून, मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आज पत्रकार परिषदेतून केले आहे.
धमकी प्रकरणात वरळी पोलिस ठाण्यात कलम ५०६ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संदेशामध्ये म्हटले आहे, की तुम्ही लोकेशन ट्रेस केल्यास ते भारताबाहेर दिसेल आणि बॉम्बस्फोट मुंबईत होईल. भारतात राहणाऱ्या ६ व्यक्ती, त्यांचे सहकारी या कामासाठी मदत करणार आहेत, असेही संदेशात म्हटले आहे. सध्या मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच दहशतवादविरोधी पथक आणि इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानमधून ज्या क्रमांकावरून धमकीचा संदेश आला, त्याला सुरक्षा यंत्रणांनी संपर्कही केला. लाहोरमधील मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीच्या क्रमांकावरून धमकीचा संदेश आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भारतातील एखादा मोबाईल क्रमांक पाकिस्तानमधून हॅक केला जाऊ शकतो. या क्रमांकाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. आमच्याकडील सर्व माहिती आम्ही राज्य एटीएसकडे दिली असल्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.