गणेशोत्सवाच्या भूखंडावर अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या भूखंडावर अतिक्रमण
गणेशोत्सवाच्या भूखंडावर अतिक्रमण

गणेशोत्सवाच्या भूखंडावर अतिक्रमण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : भूखंडावरील मालमत्ता निष्कासित झाल्यानंतर त्याच्यावर आकारण्यात येणारा कर रद्दबातल करण्यात यावा, असा नियम आहे; मात्र या नियमाला हरताळ फासून पाचपाखाडी-उदयनगर समोर असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर ठाणे पालिकेकडून करआकारणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे येथील दोन विकसकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी हा भूखंड १९८० साली मोकळा सोडला असतानादेखील त्यावर अतिक्रमण करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.

पाचपाखाडी-उदय नगर येथील काही व्यक्तींनी सन १९७९ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यांनी या मोकळ्या भूखंडावर गणेशोत्सव सुरू केला होता. १९८६ मध्ये सदर मोकळ्या भूखंडावर स्वर्णा आणि सोमेश्वर या इमारतींची उभारणी करण्यात आली. मात्र, या जागेवर साजरा होणारा गणेशोत्सव पाहता, या इमारतींच्या विकसकांनी ३० फूट बाय ७० फूट जागा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोकळी सोडली. त्यामध्ये स्व. नातू परांजपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९८७ साली काही भूमाफियांकडून दादागिरी करून ही जागा लाटण्यात आली. या भूखंडावर या भूमाफियांकडून चाळींचे बेकायदा बांधकाम करण्यात आले. गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडावर हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम केल्यानंतर सदर भूमाफियाने अधिकच्या लाभासाठी सन २००८ मध्ये अनधिकृत इमारत बांधण्याचाही प्रयत्न केला. त्याविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार आजतागायत सुमारे चार वेळा सदर ठिकाणी दिखाऊ कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईनंतर भूखंडावर बांधकाम असल्याच्या बोगस नोंदी कायम ठेवून देवराम चिंदू गरूड या नावाने कर आकारणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

या भूखंडावर सन २०१८ मध्ये बेकायदा सर्व्हिस स्टेशन उभारण्यात आले होते. त्या वेळी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली होती; मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा नव्याने सर्व्हिस स्टेशन आणि स्नॅक्स सेंटर बेकायदा उभारले आहे. हे सर्व्हिस स्टेशन, स्नॅक्स सेंटर पाडून मोकळ्या भूखंडावर डांबरीकरण करून तो भूखंड गणेशोत्सवाव्यतिरिक्तच्या काळात पार्किंगसाठी देण्यात यावा, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.

पालिकेच्या कामकाजाबाबत आश्‍चर्य
एकीकडे रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करू नये, असे ठाणे पालिकेकडून सांगितले जात आहे. मात्र गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा भूमाफियांकडून ताबा घेतला जात असून अस्तित्वात नसलेल्या बांधकामावर करआकारणी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सदरचा प्लॉट कोणाचा आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, याविषयीची संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल.
- गजानन गोदापुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93990 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..