गणेशोत्सवासाठी मिरा भाईंदरमध्ये तीन कृत्रिम तलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी मिरा भाईंदरमध्ये तीन कृत्रिम तलाव
गणेशोत्सवासाठी मिरा भाईंदरमध्ये तीन कृत्रिम तलाव

गणेशोत्सवासाठी मिरा भाईंदरमध्ये तीन कृत्रिम तलाव

sakal_logo
By

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेकडून तीन ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहेत. याशिवाय गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी दहा ते बारा ठिकाणी स्वीकृती केंद्रही सुरू केली जाणार आहेत.
नैसर्गिक तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होऊन जलचर सृष्टी धोक्यात येत असते. गणेशोत्सव संपल्यानंतर काही दिवसांनी तलावामधील मासे मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंदाही शिवार गार्डन, जॉगर्स पार्क, तसेच भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान याठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाविषयी भक्तांमध्येही जागरूकता वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी मिरा-भाईंदरमधील २६७४ गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले होते. कृत्रिम तलावांव्यतिरिक्त शहरातील अनेक नैसर्गिक तलावांमध्ये भिंत घालून त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. यातील एका भागात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशमूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले होते. विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र उघडली होती. भक्तांनी मूर्ती विसर्जनासाठी तलाव अथवा खाडीवर जाऊ नये, यासाठी स्वीकृती केंद्रातच मूर्ती स्वीकारल्या जात असत आणि नंतर महापालिकेचे कर्मचारी त्यांचे खाडीच्या पाण्यात विसर्जन करत असत. यंदाही दहा ते बारा ठिकाणी स्वीकृती केंद्र स्थापन केली जाणार आहेत. कोविड पूर्णपणे गेला नसल्यामुळे भक्तांनी विसर्जनासाठी गर्दी न करता शक्यतो स्वीकृती केंद्रात मूर्ती जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94012 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..