गणेशोत्सवासाठी लालपरी हाऊसुफुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी लालपरी हाऊसुफुल
गणेशोत्सवासाठी लालपरी हाऊसुफुल

गणेशोत्सवासाठी लालपरी हाऊसुफुल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून निर्बंधातदेखील शिथिलता आल्याने यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे एसटी विभागामार्फत कंबर कसत १००१ बसचे नियोजन आखले होते. यंदा गणेश भक्तांनीदेखील लालपरीला पसंती दिल्याने आतापर्यंत एक हजार ३२५ बुकिंग फुल झाल्याचे सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सव म्हटला, की कोकणवासीयांना गावाकडची चाहूल लागते. त्यात कोकणातील गावापाड्यांवर जाण्यासाठी आजही लालपरीचाच मोठा आधार आहे. त्यामुळे कोकण म्हटले, की लालपरी असे समीकरण तयार झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सण-उत्सवांवरील निर्बंध शासनाने शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच जण आतुर झाले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी गणपती या सणाच्या निमित्ताने येत्या २६ ते ३० ऑगस्टदरम्यान जादा वाहतूक केली जाणार आहे; तर संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सोय उपलब्ध असल्याने या वर्षी जादा वाहतुकीसाठी २८ जूनपासून आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गतवर्षी म्हणजे २०२१ मध्ये ठाणे विभागातून ८४६ एसटी बस आरक्षित करून सोडण्यात आल्या होत्या. यंदा ठाणे विभागाने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी १००१ बसचे नियोजन केले. सुरुवातीला बुकिंगला थंडा प्रतिसाद होता; मात्र आता तब्बल १३२५ बसचे बुकिंग झाले आहे.
दरम्यान, या वर्षी महापालिका क्षेत्रात निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त प्रमाणात ग्रुप आरक्षण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार आता ९०७ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे; तर इतर बुकिंगची संख्याही ४१८ एवढी आहे.

चौकट :-
डेपो संख्या
बोरिवली २८४
ठाणे ५४२
कल्याण ३४६
विठ्ठलवाडी १४३

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94072 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..