मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या गावातच ग्रामस्थांचे शासनाविरूद्ध बंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या गावातच ग्रामस्थांचे शासनाविरूद्ध बंड
मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या गावातच ग्रामस्थांचे शासनाविरूद्ध बंड

मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या गावातच ग्रामस्थांचे शासनाविरूद्ध बंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे; मात्र अजूनही कोयना धरणासाठी त्याग केलेल्या सालोशीवासीयांना स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारील गावाला आता लोकवर्गणीतून स्मशानभूमी बांधण्याची वेळ आली आहे. कोयना धरणाच्या शिवसागराच्या रत्नागिरीकडील शेवटच्या टोकाला वसलेल्या गावातील लोकांनी याआधी लोकवर्गणीतूनच रस्ता बांधला आहे. सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात मोडणाऱ्या गावकऱ्यांना इतक्या वर्षांनंतरही अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध झालेली नाही.

काही दिवसांपूर्वीच एका ज्येष्ठ नागरिकाचे निधन झाले. या व्यक्तीचे अंत्यसंस्कार रीतीरिवाजानुसार अग्नी न देता भरपावसात मातीमध्ये गाडून करावे लागण्याची वेळ आली. शिवाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्हाला अजूनही पारतंत्र्याची वागणूक मिळत आहे. आजही आमच्या गावाला आणि कांदाटी खोऱ्यातील अनेक धरणग्रस्त गावांना स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, रस्ते अशा सुविधा मिळालेल्या नाहीत, अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

आम्ही कोयना धरणग्रस्त, सालोशीचे ग्रामस्थ २०१८ पासून स्मशानभूमी, बस थांबा, पंचायत कार्यालय व अंतर्गत रस्ते यासंदर्भात गेल्या चार वर्षांपासून जी कामे प्रलंबित आहेत, त्यांचा मागोवा घेत आहोत. दर सहा महिन्यांनी आम्हाला सांगितले जाते, की अंदाजपत्रके तयार आहेत व दुरुस्तीसाठी पुन्हा आली आहेत. अंदाजपत्रके मंजूर होऊन अजूनही पुढे जाताना दिसत नाहीत. सलग पाठपुरावा करूनसुद्धा कामे होत नाहीत. अजूनपर्यंत किती अधिकारी व कर्मचारी बदलले, पण जाणूनबुजून आम्हाला वगळले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून आमचे गाव १० किलोमीटर अंतरावर आहे. तरीही आमच्याकडे पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून नेहमी दुर्लक्ष केले जाते. आमच्यावर शासनाने बहिष्कार टाकलाय, अशी आम्हा गावकऱ्यांची भावना झाली आहे. म्हणून आम्ही लोकवर्गणीमधून रस्ता बांधला, तसाच स्मशानभूमीचा शेडसुद्धा बांधू, असा निर्धार लोकांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94200 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..