ठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था
ठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था

ठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २४ : शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात पडणाऱ्या खड्‍ड्यांमुळे वाहनचालकांचा नाहक बळी जात असतो. त्यात खड्ड्यांमुळे वाहतूक संथ झाल्यामुळे तासनतास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम थेट ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनावर होत असतानाही रस्त्यांच्या बाबतीत अजूनही प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. तीन महिन्यांपूर्वी १८३ कोटी मंजूर होऊनही शहरातील १२७ रस्त्यांमधील बहुतेक रस्त्यांच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नसल्याची माहिती मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे. या कामात ठेकेदारास सबकॉन्ट्रॅक्टर देण्यास पात्र असल्यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरातील रस्ते हे त्या शहराचा विकास सांगतात; मात्र ठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था पाहता शहर विकासाचा उलट दिशेने प्रवास होत असल्याचे चित्र आहे. ठाण्याचेच मुख्यमंत्री असतानाही अजून ठाण्यातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न सोडविला जात नाही. ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी नगरविकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि युटीडब्लूटी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. ठाण्यातील १२७ रस्त्यांमध्ये ८४ रस्त्यांचे युटीडब्लुटी, १२ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट पद्धतीने, तर ३४ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये उड्डण पुलावरील रस्त्यांचाही समावेश आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराला जून २०२२ मध्ये आदेशही देण्यात आला आहे; पण यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण काम फक्त दोन ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार असून निविदेमध्ये ठेकेदार त्याचे काम दुसऱ्या ठेकेदाराला म्हणजेच सबकॉन्ट्रॅक्टला देण्यास पात्र असल्यामुळे कामाचा दर्जा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

महापालिकेच्या वतीने रस्त्यांवर खर्च
डांबरीकरणाच्या कामासाठी ७१ कोटी ९४ लाख ८६ हजार ८४ आणि युटीडब्लुटीसाठी ८१ कोटी २४ लाख ६१ हजार ७६८ आणि सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी ३० कोटी ८० लाख ५६ हजार ४८७ असे १८३ कोटी महापालिकेच्या वतीने रस्त्यांवर खर्च करण्यात येणार आहेत.

…….
कोट
गेल्या चार महिन्यांपासून ठाणेकरांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या घटनाही घडल्या असताना प्रशासनाला जाग येत नाही. तरी या सर्व रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करून ठाणेकरांना खड्डेमुक्त शहर करावे व तसे न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसेचे जनहित विधी विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94225 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..