खारघरचे गोल्फकोर्स वादात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरचे गोल्फकोर्स वादात
खारघरचे गोल्फकोर्स वादात

खारघरचे गोल्फकोर्स वादात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २४ ः खारघर गोल्फ कोर्समध्ये सिडकोतर्फे सुरू असलेले नूतनीकरणाच्या कामात आदिवासी पाड्याजवळील एका टेकडीचे खोदकाम सुरू आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय हे खोदकाम सुरू असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याने पर्यावरणवाद्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सिडकोने खारघर येथे पांडवकड्याच्या पायथ्याशी ९ होल्सचे गोल्फ कोर्स तयार केले आहे. हे गोल्फ कोर्स आता कमी पडू लागल्यामुळे आता या गोल्फ कोर्समध्ये १८ होल्स तयार करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. या कामासाठी गोल्फ कोर्समधील अंतरंग बदल केले जाणार आहेत. आतील हिरवा गालिचा, होल्स, पाण्याचे तलाव आदी नूतनीकरण केले जाणार आहे. या गोल्फ कोर्ससाठी एका टेकडीचे खोदकाम सिडकोने हाती घेतले आहे. पण यामुळे पायथ्याशी वसलेल्या एका आदिवासी पाड्याला भूस्खलनाचा धोका निर्माण होणार असल्याने पर्यावरणवाद्यांनी या कामाविरोधात आंदोलन केले होते. परंतु या आंदोलनाला न जुमानता सिडकोने खोदकाम सुरूच ठेवल्याने अखेर नेटकनेक्ट फाऊंडेशनने राज्य पर्यावरण विभागाकडे टेकडीच्या खोदकामाला परवानगी दिली आहे, नाही, याबाबतची माहिती मागवली होती. त्यानुसार संबंधित विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली असून अनेक महिन्यांपासून सिडको प्रशासन नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक करून हे काम करत असल्याचा आरोप नेटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी केला आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागातील सार्वजनिक माहिती अधिकारी (पीआयओ) सह-शास्त्रज्ञ डीएस भालेराव यांनी याबाबत सिडकोलाही विचारणा केली आहे.
------------------------------------
डोंगर उत्खननाबाबत प्रशासन उदासीन
सिडकोने खारघर गोल्फ कोर्सच्या विस्तारासाठी लँडफिल आणि बांधकामासाठी ट्रकने खोदलेल्या साहित्याचा वापर केला आहे. नेटकनेक्‍टच्‍या तक्रारीनंतर रायगड जिल्‍ह्यातील अधिकाऱ्यांनी टेकडी कापण्‍याच्‍या ठिकाणावरील उपकरणे फेब्रुवारीमध्‍ये दोन दिवसांसाठी सील केली होती; परंतु सिडकोने ही टेकडी त्यांच्या जमिनीचा भाग असल्याचा दावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. याबाबत पर्यावरणवाद्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना दोन वेळा तक्रारीवर कार्यवाही करण्यास सांगितले होते. मात्र त्यावर काहीही झाले नाही.
-----------------------------------
आदिवासी पाड्यांना धोका
या टेकडीवर वन विभागाने सामाजिक वनीकरण अंतर्गत आदिवासींना जागा दिल्याचे वातावरण तयार केल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष भगवान केसभट यांनी सांगितले; परंतु आता टेकडी कापली जाणार असल्याने त्याचा आदिवासींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. सिडकोतर्फे येथील आदिवासी पाडा आणि टेकडी यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी बीएचएनएसला नियुक्त केले होते. सिडकोने २००७ मध्ये टेकडीवर निसर्ग उद्यान तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या; पण आता त्यांचा त्यांना विसर झाल्याचे खारघरमधील पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.
-----------------------------------
गोल्फ कोर्समधील टेकडी ही गोल्फ कोर्सचा एक भाग आहे. त्याकरीता वेगळ्या परवानगीची गरज नाही. नूतनीकरण करताना टेकडीचे उत्खनन केले जाणार नाही. तसेच नूतनीकरणामुळे माती व झाडांचे नुकसान होणार नाही. झाडांसाठी सिडकोने वेगळी उपाययोजना राबवली आहे.
- तात्यासाहेब अहिरे, अभियंता, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94326 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..