कर्मचाऱ्यांची कुंडली एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचाऱ्यांची कुंडली एका क्लिकवर
कर्मचाऱ्यांची कुंडली एका क्लिकवर

कर्मचाऱ्यांची कुंडली एका क्लिकवर

sakal_logo
By

वाशी, ता. २५ (बातमीदार) ः राज्यात केवळ सनदी अधिकाऱ्यांसाठी राबवण्यात येणारी ई सेवा पुस्तिका (ई सर्व्हिस बुक) संगणक कार्यप्रणाली नवी मुंबई पालिका राबवणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या कामाची अभियंता विभागाकडून लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंतची कुंडली एका क्लिकवर उपलब्ध होणार असून ही प्रणाली राबवणारी नवी मुंबई पालिका पहिली पालिका आहे.
नवी मुंबई पालिकेत सद्य:स्थितीत दोन हजार कर्मचारी-अधिकारी आहेत. हा आकृतिबंध चार हजार कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र सेवा पुस्तिका असून त्यात त्यांची माहिती नोंद केली जात आहे. आता सर्व माहिती ई पुस्तकेद्वारे संगणकात साठवली जाणार आहे. निवृत्तिवेतन देताना अनेक विभागांतील शेरा, त्यांचे अहवाल यासाठी विलंब लागत असल्याने अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळवण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्याचा अनुभव आहे. ई सेवा पुस्तिकेमुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांवर आता ही वेळ येणार नाही. ई सेवा पुस्तिकेमुळे या कर्मचारी-अधिकाऱ्यांचे देणे या कार्यप्रणालीनुसार तात्काळ निश्चित होणार आहे. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात या कर्मचाऱ्यांना त्यांचे देणे आणि वेतन नियमित मिळणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा
या संगणक प्रणालीने निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे. यासाठी एक विशेष संगणक प्रणाली निविदेद्वारे खरेदी केली जाणार असून हे काम करण्याची जबाबदारी एखाद्या निष्णात संस्थेला दिली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही प्रणाली दोन टप्प्यांत राबवली जाणार असून पहिल्या टप्यात जुन्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे; तर दुसऱ्या टप्प्यात नव्याने भरती होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार असल्याचे उपायुक्त जयदीप पवार यांनी स्पष्ट केले.

चौकट
कर्मचारी, अधिकाऱ्यांची, इत्थंभुत माहिती आतापर्यंत पुस्तिका रूपात संकलित केली जात होती; मात्र यानंतर ही माहिती ई सर्व्हिस बुकद्वारे साठवून ठेवली जाणार आहे. जेणेकरून प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने ती सोपी व सोयीस्कर पडणार आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94383 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..