बाप्पाच्या आगमनाची आतुरता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या आगमनाची आतुरता
बाप्पाच्या आगमनाची आतुरता

बाप्पाच्या आगमनाची आतुरता

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर) ः गणरायाच्या आगमनाला अवघे सहा दिवस उरले आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो; मात्र गेली दोन वर्षे कोरोनाचे सणांवर विघ्न होते. त्यामुळे निर्बंधातच सण साजरा करण्याची वेळ भक्तांवर आली होती. यंदा निर्बंधाविना उत्सव साजरा होत असल्याने सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठा या शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप उभारण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कार्यकर्ते दिवस-रात्र एक करून कामाचे नियोजन करत आहेत. त्यामुळे सर्वत्र या आनंद सोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
---
कार्यकर्त्यांच्या बैठकांवर बैठका
यंदा जल्लोषात उत्सव साजरा करायचा असल्याने कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नियोजन केले जात आहे. मंडप, स्पीकर, मूर्तीचे बुकिंग करावे लागत असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची दोन ते तीन महिन्यांपूर्वीच तयारी सुरू झाली आहे. तसेच गणेशोत्सव काळातील विविध कार्यक्रमांची आतापासूनच आखणी केली जात आहे. मंडपासाठीचा परवाना काढणे, वर्गणी जमा करणे, अशा कामांचे वाटप कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांचे आकर्षण
यंदा ऐतिहासिक, पौराणिक तसेच देशाच्या अमृतमहोत्सवावर आधारित एकात्मतेवर भर देणारे देखावे साकारले जाणार आहेत. तसेच चलतचित्रांमधून विविध घटनांवर भाष्य केले जाणार असून देखाव्यांसाठी कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरू आहे.
----
घरोघरी लगबग वाढली
घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. मूर्तीची निवड करण्यापासून घराला रंगरंगोटी, सजावटीची खरेदी केली जात आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त आतुर झाले आहेत. घरगुती गणपती असला तरी काही मंडळींनी घरातील मंडळींसह मित्र व आप्तेष्ट मखर बनवण्यासाठी मदत करत आहेत.
---
दोन वर्षांच्या खंडानंतर उत्सव साजरा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा उत्सव अधिकाधिक भव्य व सुंदर व्हावा, यासाठी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. यासाठी दोन महिन्यांपासून तयारी सुरू आहे.
- रामदास शेवाळे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळंबोली

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94390 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..