खड्ड्यांवरून आयुक्तांचा फतवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांवरून आयुक्तांचा फतवा
खड्ड्यांवरून आयुक्तांचा फतवा

खड्ड्यांवरून आयुक्तांचा फतवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई, ता. २५ ः गणेश आगमनाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे विविध अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत ३० ऑगस्टपर्यंत शहरातील खड्डे बुजवण्याची डेडलाईन दिली असून यात अपयशी ठरल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.
जुलै महिन्यापासून पावसाने चांगला जोर धरला. एकाच महिन्यात प्रमाणापेक्षा जास्त पावसाचा मारा रस्त्याला सोसावा लागल्यामुळे नवी मुंबईतील अंतर्गत भागात अनेक ठिकाणी खड्डे पडले. सीबीडी-बेलापूर भागातील कोकण भवनसमोरील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रेल्वेखालील भुयारी मार्गातील रस्त्यांची चाळण झाली आहे. नेरूळ, सीवूड्स, जुईनगर, सानपाडा या भागातील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली आणि ऐरोली या भागात विसर्जन घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांवरून दीड दिवसांचे गणपती विसर्जनाला घेऊन जायचे कसे, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत स्वतः महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भेट देऊन पाहणी दौरा केला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी विभागामार्फत रस्तेदुरुस्तीचे दोन वेळा डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहेत; परंतु काही दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या पावसाच्या मोठ्या तडाख्याने पुन्हा एकदा शहरातील अंतर्गत रस्त्यांची धुळधाण उडाली आहे. दुरुस्त केलेल्या खड्ड्यांमधील माल बाहेर येऊन काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.
----------------------------------
विसर्जनस्थळांकडे जाणारे रस्ते दुरुस्त करा
शहरांतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विसर्जन घाटांचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला आहे. गेल्या वर्षी यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आली आहे. या वर्षी तब्बल एक लाखापेक्षा जास्त दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन होईल, असा अंदाज प्रशासनाला आहे. त्यामुळे विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाने कंत्राटदारांना दिले आहेत.
---------------------------------
खारघरमध्ये रस्त्यांची चाळण
पनवेल महापालिकेला सिडकोने हस्तांतर केलेल्या खारघर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खारघर शहरातील एकही सेक्टर असा शिल्लक राहिला नाही, ज्यात रस्त्यावर खड्डे पडले नाहीत. हे रस्ते सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी सिडकोने नेमलेल्या कंत्राटदारांवर आहे. पनवेल महापालिकेला काही हस्तक्षेप करता येत नाही; तर सिडकोकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याने खारघरमधील गणेशभक्तांवर यंदा खड्ड्यांचे संकट असणार आहे.
--------------------------------------
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात; परंतु तुलनेत या वर्षी खड्ड्यांचे प्रमाण कमी आहे. गणेश विसर्जनापूर्वी खड्डे बुजवून रस्ते विनाअडथळा करण्याचे आदेश बजावले आहेत. खड्डे पडलेले दिसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94480 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..