शालेय बालकांसाठी धोक्‍याची घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय बालकांसाठी धोक्‍याची घंटा
शालेय बालकांसाठी धोक्‍याची घंटा

शालेय बालकांसाठी धोक्‍याची घंटा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : हात-पाय-तोंडाच्या संसर्गांचा प्रसार शाळेत जाणाऱ्या बालकांमध्ये वाढत आहे. या आजाराचे निदान वेळेत करून योग्य उपचार घेतल्यास यामुळे होणाऱ्या वेदनांचा त्रास कमी करणे शक्य आहे. तसेच बालकांची वैयक्तिक स्वच्छता योग्यरितीने ठेवणे गरजेचे आहे, असा सल्‍ला डॉक्‍टारांनी दिला आहे.
हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य संसर्ग असून या आजारामध्ये हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येऊन मुलांना ताप येतो. यामध्ये तोंडामध्ये अल्सरदेखील येतो. पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप, सर्दी, खोकला होतो; त्याचप्रमाणे हा संसर्गदेखील पावसाळ्यात उद्भवतो.

प्रसार कसा होतो
हा आजार प्रामुख्याने कॉकसॅकी जातीच्या विषाणूमुळे होतो. बाधित बालकाच्या शिंकताना नाकातोंडातून बाहेर पडणारा द्रव, तोंडातील थुंकी, अंगावर आलेले पुरळ, त्यातून बाहेर पडणारा द्रव या माध्यमातून याचा प्रसार होतो. तसेच बाधित बालकाचा स्पर्श झालेल्या वस्तूंद्वारेही याचा प्रसार होतो.

प्रमुख लक्षणे
ताप, घसादुखी, अस्वस्थ वाटणे, भूक न लागणे, तोंडामध्ये अल्सर येणे, हात-पायावर पुरळ येणे, चिडचिड होणे, डोकेदुखी ही याची प्रमुख लक्षणे आहेत. काही बालकांमध्ये मागच्या पृष्ठभागावरही पुरळ आल्याचे आढळले आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. अगदी लहान बालके आणि अंगणवाडी किंवा नर्सरीमध्ये जाणाऱ्या बालकांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळत आहे. मुली आणि मुलांमध्येही याची लागण होत आहे.

काय करावे
बालकांनी वारंवार हात धुणे
मुलांकडून वापरण्यात येणारी भांडी वेगळी ठेवणे
त्‍यांचा वावर असलेला भाग निर्जंतुक करणे
बाधित बालकांशी थेट संपर्क टाळावा. उदाहरणार्थ, बालकाला जवळ घेणे, मिठीत घेणे. बालकाला ताप किंवा अंगावर पुरळ अशी लक्षणे आल्यास शाळेत पाठवू नये.

हँड-फुट-माऊथ डिसीज असे या आजाराला संबोधले जाते. मुंबईसह राज्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा आजार आढळत आहे. हा आजार धोकादायक नाही. ८ दिवसांत मूल बरे होते. यासाठी सामान्य उपचार दिले जातात. खरूज किंवा दुखत असेल तर त्यावर मलम दिले जाते. पण हे प्रमाण पावसाळ्यात वाढते.
- डॉ. पल्लवी सापळे, जेजे समूह रुग्णालये अधिष्ठाता व बालरोगतज्ज्ञ

सुरुवातीला डे केअर किंवा अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या बालकांमध्ये याचे प्रमाण जास्त होते. बंद वातावरणामध्ये एकमेकांशी संबंध आल्याने याचा प्रसार वाढला होता; परंतु आता शाळेत जाणाऱ्या थोड्या मोठ्या बालकांमध्येही याचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. सुरेश बिराजदार, बालरोगतज्ज्ञ

हात, पाय, तोंडाचा संसर्ग सर्वसामान्य असून कॉकसॅकी ए १६ आणि एन्ट्राव्हायरस ७१ या विषाणूंमुळे होतो. साधारणतः एक आठवडा याची लक्षणे राहतात. तोंडामध्ये आलेल्या अल्सरमुळे खूप वेदना होतात. त्यामुळे बालकांना काहीही खाणे त्रासदायक असते. या आजारामध्ये लक्षणांनुसार उपचार केले जातात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावे.
- डॉ. संदीप सावंत, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94482 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..