गणपतीच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले उंब्राली गाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले उंब्राली गाव
गणपतीच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले उंब्राली गाव

गणपतीच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले उंब्राली गाव

sakal_logo
By

गणरायाच्या सजावटीचे उंबार्ली गाव
गायत्री ठाकूर

डोंबिवली : बाप्पाच्या आगमनाचे वेध भाविकांमध्ये लागलेले असतानाच डोंबिवलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावात मात्र वेगळीच लगबग सुरू आहे. कुणी मखरांवर शेवटचा हात फिरवत आहे, तर कुणी त्याला आणखी सुशोभित करण्यासाठी झटत आहे. कोणाचा देखावा सर्वात सुंदर दिसणार याची जणू स्पर्धाच लागलेली... एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही मागे टाकेल असा भव्य देखावा उभारण्यात दंग झालेले गावकरी... या अनोख्या गावाचे नाव आहे उंबार्ली! सव्वाशे घरे असलेल्या या गावाने गणपती सजावटीची आपली परंपरा अनेक वर्षांपासून जपून ठेवली आहे.
कल्याण-शिळफाटा मार्गावर मानपाडा गावाच्या आत निसर्गाच्या सानिध्यात असलेले उंबार्ली गाव आहे. या गावात आगरी समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळे गौरी-गणपतीचा सण हा त्यांच्यासाठी वर्षातील सर्वात मोठा मानला जातो. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर या गावाचा कल असतो, पण त्यातही उत्सुकता असते ती कोणाच्या गणपतीची सजावट सर्वाधिक आकर्षक असेल याची. त्याची येथे रितसर स्पर्धा लागते. म्हणूनच हे गाव गणपती सजावटीसाठी प्रसिद्ध असून ही सजावट पाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबईतूनही भाविक आवर्जून भेट देतात. गावात प्रत्येकाच्या घरी गणपतीची सजावट ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही गणपतींची सजावट ही चालू घडामोडींवरसुद्धा केलेली असते. या सजावटीतून समाजाला काहीतरी संदेश द्यावा, हा उद्देशही असतो.
गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधी साधारण दोन ते तीन महिने आधीपासूनच सजावटीचे नियोजन सुरू होते. कमी खर्चात नयनरम्य सजावट तयार करण्यात येथील गावकऱ्यांचा हातखंडा आहे. पूर्वी सजावटीमध्ये थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा, पण आता त्यावर बंदी असल्याने करवंट्या, पुठ्ठे, गोणपाट, कागद, लाकूड, मलमली पडदे, आकर्षक फुले आणि विविधरंगी प्रकाशझोत वापरून मखर सजवला जातो. त्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य आपापल्या परीने हातभार लावत असतो. पण ही सर्व कलाकुसर अत्यंत ‘गुप्त’ पद्धतीने सुरू असते. ३० हून अधिक वर्षांपासून गावात सजावट स्पर्धा आयोजित केली जात असल्यामुळे ही दक्षता घेतली जाते. इतकेच काय तर या सजावटीसाठी कुटुंबाबाहेरील व्यक्तीची मदत घेतली तरी तो स्पर्धेतून बाद ठरतो.

दिवसभर भाविकांची गर्दी
उंबार्ली हे गाव मानपाडा गावाच्या आत असल्याने पूर्वी या गावात जाण्यासाठी वाहनांची सोय नसायची. त्यामुळे मानपाडा ते उंबार्ली हा पायी प्रवास करावा लागायचा, पण तरीही भाविक आणि कलाप्रेमी गणेशोत्सवात आवर्जून या गावी येत असत. आता वाहतुकीची समस्या दूर झाल्यामुळे प्रेक्षकांचा राबता वाढला आहे. संपूर्ण दिवस या गावामध्ये पाहुण्यांची गर्दी असते. विशेष म्हणजे घरी देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचा या गावात आदरपूर्वक पाहुणचार केला जातो. प्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणालाही जाऊ देत नाही, ही उंबार्ली गावकऱ्यांची खासियत आहे.

स्पर्धेतून कलात्मकता
गणेशोत्सव सजावटीसाठी उंबार्ली गाव प्रसिद्ध झाले आहेच, पण अनेक स्पर्धांमध्येही हे गाव चमकले आहे. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट सजावट म्हणून या गावाला अनेक वेळा पारितोषिके मिळाली आहेत. सजावटीसाठी केलेली मेहनत आणि विशेषत: सजावट करण्यासाठी असणारा उत्साह हा येथील गावकऱ्यांच्या बोलण्यावरून दिसून येतो.

यंदा साधेपणा जपणार
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर गणपतीच्या सजावटीचे काम पूर्वीपेक्षा जास्त जोमाने सुरू झाले आहे. पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने लोक ही सजावट पाहण्यासाठी येणार आहेत, पण यंदाच्या वर्षी केली जाणारी सजावट ही साध्या पद्धतीने करण्यात आली आहे, असे गावातील हितेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94634 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..