अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

मुंबई अवतीभवती

शिक्षक संदीप परब यांचा सन्मान
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत राज्यव्यापी ऑनलाईन शिक्षण उपक्रम राबवण्यात आले होते. कोरोनाकाळात राज्यव्यापी ऑनलाईन शिक्षण अध्यापन घेण्यात आले होते. पवई येथील तिरंदाज व्हिलेज लोकमान्य प्राथमिक मराठी पालिका शाळेचे शिक्षक संदीप परब यांनी कोरोनाकाळात शाळा बंद असताना या उपक्रमात सहभाग घेतला. पाचवीच्या वर्गाला गणित विषयाचे प्रभावी व दर्जेदार ऑनलाईन अध्यापन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. भांडुप येथे शुक्रवारी (ता. २६)उपशिक्षणाधिकारी (शहर) संजीवनी कापसे यांच्या हस्ते त्‍यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पूर्व उपनगरचे उपशिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे, अधीक्षक आरती खैर, गोरखनाथ भवारी उपस्थित होते.


घाटकोपरमधील हत्येप्रकरणी दोघांना अटक
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेकडील असल्फा व्हिलेज येथील २२ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांनाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील, अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली. गणेश शिंदे असे मृताचे नाव आहे. तर स्थानिक कुख्यात गुंड मनजीत सिंग, विनोद सिंग यांच्यासह आणखी दोघांचा या गुन्ह्यात समावेश आहे. साने गुरुजीनगर, आंबेडकरनगर, असल्फा या ठिकाणी बुधवारी (ता. २४) रात्री ८ च्या सुमारास आरोपींनी गणेशवर चाकूहल्ला केला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात अमर कदम यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतरही आरोपींना अटक झाली नसल्याने मृताच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे परिमंडळ ७ चे उपआयुक्त प्रशांत कदम यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर दोघांनाही लवकरच अटक केली जाईल, असे डहाके यांनी सांगितले.

दाना पानी किनाऱ्यावर तेलाचे तवंग
मालाड, ता. २७ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मढ बेटच्या जगप्रसिद्ध दाना पानी समुद्र किनाऱ्यावर तेलाचे तवंग पसरले आहे. काही दिवसांपासून दाना पानी समुद्र किनाऱ्यावर तेलाचे तवंग पसरल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. किनाऱ्यावरची वाळूदेखील काळी झाली आहे. यामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर फेरफटका मारता येत नाही. पर्यटक संख्या रोडावल्याने स्थानिकांच्या रोजगाराला फटका बसला आहे. तेलतवंग पसरल्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असून समुद्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे किनाऱ्यावर पसरलेल्या तेलाचे तवंग लवकरात लवकर हटवण्यात यावेत, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिकांनी केली आहे.

गिरणगावात ''जागृत मुंबईकर'' अभियान
शिवडी, ता. २७ (बातमीदार) : मुंबई शहर हे नेहमी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे यापूर्वी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले झालेले आहेत. त्यामध्ये जीवित व वित्तहानीही झाली आहे. अशा प्रकारचे हल्ले व बॉम्बस्फोट घडवून आणण्याबाबत संभाव्य धमक्याही येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, स्त्रियांविरूद्धचे गुन्हे, महिलांची सुरक्षा व सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी; तसेच त्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या हेतूने मुंबई पोलिसांच्या वतीने ''जागृत मुंबईकर अभियान'' हा जनजागृती कार्यक्रम सुरू केला आहे. दोन वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यामुळे मुंबईमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविक तसेच नागरिकांना सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिस आणि चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ''जागृत मुंबईकर अभियान'' शुक्रवारी (ता. २६) चिंचपोकळी चिंतामणीच्या मंडपात करण्यात आले होते. या वेळी पोलिस निरीक्षक पोपट आव्हाड यांनी तरुणाईला समाज माध्यमांवर होणाऱ्या लैंगिक फसवणुकीपासून सावध केले. महिला पोलिस नाईक पद्मा माथाईस यांनी विविध प्रकारच्या बॉम्बविषयी माहिती देऊन नागरिकांना सतर्क केले. दरम्यान, पोलिस हवालदार विष्णू महाले, पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94649 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..