कौटुंबिक हिंसाचारावर ‘भरोसा’ची मात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौटुंबिक हिंसाचारावर ‘भरोसा’ची मात्रा
कौटुंबिक हिंसाचारावर ‘भरोसा’ची मात्रा

कौटुंबिक हिंसाचारावर ‘भरोसा’ची मात्रा

sakal_logo
By

प्रकाश लिमये : भाईंदर

कौटुंबिक हिंसाचारामुळे, पती-पत्नीमध्ये झालेल्या बेबनावामुळे अनेक घरे उध्वस्त होतात, अनेकांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने मनस्ताप सोसावा लागत असतो. मात्र हा कौटुंबिक वाद पोलिस ठाण्यापर्यंत न जाता अथवा गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रियेत न अडकता परस्पर सामंजस्याने सोडवला गेला तर कुटुंब पुन्हा एकदा आनंदाने नांदू लागते. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने आतापर्यंत पंचाहत्तर टक्के कौटुंबिक वाद केवळ समुपदेशनाच्या आधारे सोडविण्यात यश प्राप्त केले आहे.
एखाद्या कुटुंबात पती-पत्नीमध्ये वाद झाला किंवा कौटुंबिक हिंसाचारची घटना घडली तर त्यात स्थानिक पोलिस संबंधितांची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत. गुन्हा दाखल झाल्यामुळे पुढे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. यात वेळ, पैसा तर खर्च तर होतोच, मात्र त्यात गुंतलेल्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा प्रकरणात वेळीच समुपदेशन झाले किंवा कायदेशीर सल्ला मिळाला तर गुन्हा दाखल होण्याआधीच कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवले जातात. पोलिसांचा ‘भरोसा सेल’ याचे माध्यम बनले आहे.
पती-पत्नीमधील वाद, ज्येष्ठ नागरिकांचा छळ, लहान मुलांचे गैरमार्गाला जाणे अशा प्रकारच्या समस्यांवर ‘भरोसा सेल’ काम करत आहे. स्थापना झाल्यापासून गेल्या सव्वा वर्षात भरोसा सेलकडे सुमारे पाचशे प्रकरणे दाखल झाली. यातील नव्वद टक्के प्रकरणे कौटुंबिक हिंसाचाराची, सहा टक्के ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित व चार टक्के प्रकरणे मुलांशी संबंधित होती. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधितांचे समुपदेशन करणे, गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय होईल याची कल्पना देणे, आवश्यक तो कायदेशीर सल्ला देणे आदी कामे ‘भरोसा सेल’ पार पाडते. यापैकी सुमारे साडे तीनशे प्रकरणांमध्ये ‘भरोसा सेल’ने यशस्वी तोडगा काढल्याने कुटुंबाची घडी विस्कटली नाही. ‘भरोसा सेल’ने प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी, समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, कायदेशीर सल्ला देण्यासाठी वकील आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टर अशा तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली आहे आणि हा सल्ला पूर्णपणे मोफत दिला जातो.

पुरुषांनाही मदतीचा हात
‘भरोसा सेल’ हा केवळ महिलांसाठीच काम करतो असा एक समज आहे. मात्र प्रत्यक्षात हा विभाग पुरुषांनाही मदत करतो. या विभागाकडे आलेल्या तक्रारींपैकी तीस टक्के तक्रारी पुरुषांनी केल्या होत्या. त्यामुळे पुरुषांनाही या सेलचा मोठा आधार वाटत आहे.

परदेशातील फसवणुकीची प्रकरणे आव्हानात्मक
परदेशात गेलेल्या माहिला, अथवा पुरुषांची फसवणूक झाल्याबाबतची तीन प्रकरणे ‘भरोसा सेल’कडे दाखल झाली होती. सेन्ट्रल आफ्रिका, दुबई व कुवेत या ठिकाणची ही प्रकरणे होती. या तक्रारदारांना मदत करण्याचे काम मोठे आव्हानात्मक होते. त्या देशातील कायद्यांचा अभ्यास करून, तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय दूतावासाची मदत घेऊन पीडितांची यशस्वीपणे सुटका करता आली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94679 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..