हक्कांसाठी धडक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हक्कांसाठी धडक मोर्चा
हक्कांसाठी धडक मोर्चा

हक्कांसाठी धडक मोर्चा

sakal_logo
By

बेघरांचा विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा
पुनर्विकासाच्या नावाखाली वडाळा येथील झोपडपट्टीवासीय उघड्यावर

वडाळा, ता. २७ (बातमीदार) ः वडाळा पूर्व कोरबा मिठागर येथील आनंदनगर परिसरात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या ४६४ झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत ओमकार रिअल्टर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीने हाती घेतले आहे; मात्र गेल्या १२ वर्षांत कोणत्याही प्रकारचा पुनर्विकास येथे करण्यात न आल्याने साधारण २५० झोपडीधारक बेघर झाले आहेत; तर झोपडीधारकांना गेल्या पाच वर्षांत विकासकाने भाडे न दिल्याने येथील झोपडीधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून याविरोधात विकासकाच्या सायन येथील कार्यालयावर शुक्रवारी (ता. २६) झोपडीधारकांनी आपल्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढला होता. मागण्या मान्य नाही झाल्या, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील या वेळी दिला आहे.
२००९ मध्ये सुरणा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने आनंदनगरमधील झोपड्यांचे सर्वेक्षण करून पुनर्विकास करण्याचे काम झोपडीधारकांना विश्वासात घेऊन हाती घेण्यात आले होते. तसेच येथील घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत इतर ठिकाणी स्थलांतरासाठी प्रत्येक झोपडीधारकास प्रतिमहा भाडे देण्यात येईल, असा झोपडीधारकांशी रीतसर करारदेखील करण्यात आला होता. त्यानुसार ४६४ झोपडीधारकांपैकी साधारण २५० झोपडीधारकांनी इमारतीच्या बांधकामासाठी आपली राहती घरे खाली केली; मात्र गेल्या १२ वर्षांत येथे कोणत्याही प्रकारचे पुनर्विकासाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. त्यात स्थलांतर झालेल्या झोपडीधारकांना गेल्या पाच वर्षांपासून प्रतिमहा भाडे मिळणे बंद झाल्याने या झोपडीधारकांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाने झोपड्या खाली करण्याचे काम केले; मात्र आम्हा झोपडीधारकांना बेघर करून ठेवले असल्याचा संतप्त आरोप झोपडीधारकांनी केला असून याविरोधात झोपडीधारकांनी म्हाडा आणि महापालिका कार्यालयात तक्रार केली, तसेच या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती आरटीआयच्या माध्यमातून मागवली असता सदरील प्रकल्प सुरणा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे नसून ओमकार रिअल्टर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीने ताब्यात घेतला असल्याचे वास्तव समोर आले आहे. झोपडीधारकांना तसेच आनंद नगर को-ऑप. हौसिंग सोसायटीला विश्वासात न घेता विकासकाने केलेल्या अंतर्गत व्यवहारामुळे येथील झोपडीधारक नाराजी व्यक्त करीत असून याविरोधात झोपडीधारकांनी विकासकाच्या सायन येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढून निषेध केला आहे.

मागण्या
पुनर्विकासाला झोपडीधारकांचा विरोध नाही; मात्र हा विकास करताना विकासकाने झोपडीधारकांना विश्वासात घ्यावे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले प्रतिमहा भाड्याचे धनादेश देण्यात यावेत. तसेच लवकरात लवकर येथील इमारतीचे बांधकाम कारण्यात यावे व हक्काचे घर झोपडीधारकांना देण्यात यावे, अशी मागणी येथील झोपडीधारकांनी व्यक्त केली आहे.

फोटो ओळ-
वडाळा पूर्व कोरबा मिठागर येथील आनंदनगर झोपडपट्टीधारकांनी विकासकाच्या सायन येथील कार्यालयावर हातात फलक घेऊन काढलेला धडक मोर्चा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94700 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..