पारंपरिक वाद्यांना भक्‍तांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपरिक वाद्यांना भक्‍तांची पसंती
पारंपरिक वाद्यांना भक्‍तांची पसंती

पारंपरिक वाद्यांना भक्‍तांची पसंती

sakal_logo
By

पोलादपूर, ता. २८ (बातमीदार) : गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतशी पारंपरिक वाद्यांना भक्‍तांकडून मागणी वाढली आहे. सजावट, पूजा साहित्‍याबरोबरच टाळ-मृदुंग व ढोलकीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.
पर्यावरणपूरक सजावटीला गणेशभक्तांची पसंती असल्याचे चित्र पोलादपूरमध्ये दिसून येत आहे. त्‍यासाठी भक्त नवनवे उपक्रम राबवत असून घरोघरी नवनवीन आकर्षक सजावटीला प्राधान्य देत आहेत. बाजारपेठेत कृत्रिम फुले, रेशमी वस्‍त्रे, झालर, मोती-मण्यांच्या माळा, कापड, लाकडी, पुठ्ठ्याचे मखर आदी साहित्‍यांची जोरदार विक्री होत आहे. या साहित्‍याच्या किमती १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्‍या असल्‍या तरी खरेदीचा उत्‍साह मात्र कायम आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबत होत असलेल्‍या जनजागृतीमुळे सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती बाप्पाची आरासही इको-फ्रेंडली करण्याला पसंती दिली जात आहे. रेशमी, मखमली, वेलवेटच्या कपड्याची आरास, रंगीबेरंगी कृत्रिम फुले, पानवेलींचा सजावटीसाठी उपयोग केला जात आहे.
बाजारात दाखल झालेले पर्यावरणस्नेही मखर फोल्डेबल असल्याने त्यांचा दीर्घकाळ वापर करता येणार आहे. मोत्यांचे, कापडी तोरण, वॉल हॅंगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक खरेदी करीत आहेत. गणपतीपाठोपाठ गौरींचे आगमन होत असल्याने गौरीच्या साजशृंगाराच्या साहित्याचीही बाजारात रेलचेल आहे. त्यात रेडिमेड साड्या, दागिने, गजरे, वेण्या, खण, मुखवटे आदी बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याशिवाय सजावटीसाठी विद्युत रोषणाईच्या माळा, फोकस लाईट यांच्या खरेदीवरही भर दिला जात आहे.

................

गावागावांत घुमणार टाळ-मृदुंगाचा स्‍वर
पोलादपूर (बातमीदार)ः गणेशोत्‍सवानिमित्त वातावरणात एक वेगळाच उत्‍साह संचारला आहे. गावोगावी टाळ, चिपली, वीणा, मृदुंग यांचे सूर कानी पडणार असल्‍याने यंदा टाळ-मृदुंगाला भक्‍तांकडून मोठी मागणी आहे. दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्‍सव साधेपणाने साजरा झाला, या वर्षी नियमांचे बंधन नसल्याने घरोघरी टाळ-मृदुंगांचा नाद घुमणार असून खरेदीबरोबरच जोरदार सरावही सुरू आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या पोलादपूर तालुक्यातील बहुतांश घरांत ढोलकी, वीणा, टाळ-मृदुंग ही वाद्य पाहायला मिळतात. या वर्षी बाप्पाचे स्‍वागत साग्रसंगीत करायचे असल्‍याने ठेवणीतील वाद्ये दुरुस्‍तीसाठी अनेकांची लगबग सुरू आहे.
आरती, भजन, कीर्तनासाठी टाळ, झांजाबरोबरच ढोलकीला पसंती दिली जाते. त्‍यामुळे ढोलकी विक्रेत्‍यांबरोबरच यंदा दुरुस्‍ती करणारे कारागिरही ठिकठिकाणी फिरताना दिसतात.

निर्बंध शिथिल झाल्‍याने यंदा गणेशोत्सवात घरोघरी टाळ-मृदुंग व ढोलकीचा स्वर घुमणार आहे. त्‍यासाठी भक्‍तांकडून नवीन वाद्ये खरेदी करण्याबरोबरच जुन्या वाद्यांच्या दुरुस्‍तीकडे कल आहे.
- गोपीचंद घाडगे, ढोलकी वादक

.....................

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94752 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..