जमिनीत गाडलेल्या सोन्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमिनीत गाडलेल्या सोन्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटक
जमिनीत गाडलेल्या सोन्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटक

जमिनीत गाडलेल्या सोन्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : जमिनीत गाडलेले पुरातन सोने मिळाले असून ते कमी किमतीत विकायचे आहे, असे भासवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा वसईत पर्दाफाश झाला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे कक्ष तीनच्या पथकाने ही कामगिरी केली असून, उत्तर प्रदेशामधून चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून बनावट सोन्याची पाने, मनी, माळ असा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशाल धर्मा राय (१९), संजू वालिया राय (२७), शिवराम हिरालाल माली (५७), मीना रामलाल सोलंकी (४५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण उत्तर प्रदेशच्या खेडा फिरोजाबादचे रहिवाशी आहेत. मागच्या काही महिन्यांपासून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय हद्दीत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. जमिनीत गाडलेले सोन्याचे पुरातन सोने मिळाले आहे आणि ते कमी किमतीत विकायचे आहे, असे भासवून फसवणुकीचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने मुख्यालय पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे कक्ष शाखा तीनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलिस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बावरकर, पोलिस नायक मनोज सकपाळ, पोलिस अंमलदार राकेश पवार, अश्विन पाटील, सुमित जाधव यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने तपास सुरू केला असता या टोळीने २५ जुलै रोजी सायंकाळी वसई पश्चिम भाजीमार्केट जवळील पंचवटी हॉटेलजवळ एका अनोळखी व्यक्तीने सुनील प्रवीणचंद्र चोक्सी यांचा विश्वास संपादन करून, पितळी धातूची पाने सोन्याची असल्याचे भासवून त्यांची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा करण्याची आरोपींची पद्धत, त्यांचे ठिकाण, पोशाख यावरून गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणातून हे आरोपी फसवणूक केल्यानंतर उत्तर प्रदेशला फरारी होत असल्याचे समोर आले. सर्व आरोपींचे मोबाईल लोकेशन घेऊन प्रमोद बडाख यांच्या पथकाने उत्तर प्रदेश येथे सापळा रचून या चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ किलो वजनाची बनावट सोन्याची पाने, मनी आणि माळ असा ऐवज जप्त केला आहे.

३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
ही टोळी एकट्या माणसाला गाठते, त्याचा विश्वास संपादन करते आणि सोन्याच्या नावाखाली पितळेचे दागिने देऊन फसवणूक करून फरारी होते. या आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी अशा भामट्यांना बळी पडू नये, असे अहवान पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी केले आहे.

फोटो कॅप्शन : बनावट सोन्याचे दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीसह पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांचे पथक.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94788 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..