गौरीचे मुखवटे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरीचे मुखवटे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात
गौरीचे मुखवटे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात

गौरीचे मुखवटे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

पेण, ता. २९ (वार्ताहर) : गणपतीचे माहेरघर असणाऱ्‍‌या पेण तालुक्यात गणरायापाठोपाठ आगमन होणाऱ्या गौराईचे मुखवटे बनवण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गौराईसाठी मातीच्या मुखवट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने महिला कारागिरांची लगबग सुरू आहे.
गौराईसाठी अनेक ठिकाणी तेरड्याच्या झाडांची, तर काही ठिकाणी पुठ्याच्या कागदावर रंगरंगोटी करून गौराईला सजवले जाते. पेणमध्ये बऱ्याच ठिकाणी गौराईसाठी मातीचे मुखवटे बनवले जातात. या मुखवट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शासनाने निर्बंध हटवल्‍याने या वर्षी गणेशोत्‍सव जल्‍लोषात साजरा करण्याचे नियोजन भक्‍तांकडून करण्यात आले. गणरायाच्या पाठोपाठ गौराईचे आगमन होत असल्‍याने पूजा साहित्‍य, फराळ, नैवेद्य, गौरीचा साज-शृंगार आदींसाठी महिलांची जोरदार तयारी सुरू आहे.
गौराईच्या स्‍वागतासाठी दरवाजापासून जेथे गौराई विराजमान होते तिथपर्यंत लक्ष्मीची पावले काढली जातात. गौराई ही माहेरवाशीण म्हणून ओळखली जात असून माहेरी आलेल्या गौराईचे लाड गृहिणींकडून पुरवले जातात. दोन वर्षे कोरोनामुळे गौराईच्या मुखवट्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट होते. त्यामुळे या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसानही झाले होते. पण यंदा भक्‍तांकडून गौराईचा साजशृंगार, सजावट, पूजन, नैवेद्य, त्‍यानिमित्त आयोजित मनोरंजनात्‍मक कार्यक्रम आदींचे नियोजन भक्‍तांनी केले आहे.
गौरीचे मुखवटे २०० ते ५०० रुपयांपर्यंत असून साज-शृंगारासह संपूर्ण जोडी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत उपलब्‍ध आहे. या गौराई मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, डोंबिवली अशा अनेक शहरांतून आलेल्या ऑर्डरप्रमाणे सुखरूप पोहोचविल्या जातात. एका कारखान्यात महिला-पुरुष असे सुमारे वीस ते पंचवीस कामगार एकत्र येऊन मुखवटे बनवतात.
एक मूर्ती बनवण्यासाठी म्हणजेच साचातून काढण्यापासून फोल्डिंग, कापडकाम, पेंटिंग, लेअर लावणे आणि गाडीत भरेपर्यंत एक दिवस लागतो. या वर्षी व्यावसायिकांना भरपूर ऑर्डर आल्‍याने चांगला नफा होणार आहे.

सुरुवातीपासून आवड म्‍हणून गौरीचे मुखवटे तयार करण्यास सुरुवात केली. त्‍याला दोन भावांची, वडिलांची साथ मिळाल्‍याने १५ वर्षांपासून या व्यवसायात आहे. आमचे मुखवटे बनविण्याचे काम वर्षभर चालूच असते. कोरोनामुळे आर्थिक संकट आले होते, मात्र या वेळी नियम शिथिल झाले आहेत आणि पीओपीवरील बंदी उठल्याने गौराईचे मुखवटे तयार केले असून ग्राहकांच्या ऑर्डरही मोठ्या प्रमाणावर मिळाल्या आहेत.
- अमृता गावंड, मूर्तिकार, पेण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94794 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..