गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा खरेदीने फुलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा खरेदीने फुलल्या
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा खरेदीने फुलल्या

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा खरेदीने फुलल्या

sakal_logo
By

गणेशभक्तांचा खरेदी उत्सव
निर्बंधमुक्त वातावरणात बाप्पाच्या स्वागतासाठी बाजार फुलला
भाविकांच्या गर्दीसह सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलला

भारती बारस्कर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले असून बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश गीतांचे सूर कानी पडू लागले आहेत. सर्वत्र ढोल-ताशांचा गजर सुरू झाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले आहे. उत्सवापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी लालबाग, परळ, दादर, मशीद बंदर, क्रॉफर्ड मार्केट आदी होलसेल व किरकोळ वस्तूंचे बाजार गर्दीने फुलून गेले होते. कोरोनामुक्त वातावरणात भक्तांनी गणेशोत्सवासाठी सढळ हस्ते खिसा रिकामा करीत एक प्रकारे खरेदी उत्सव साजरा केला.

गणेशोत्सवासाठी मुंबईच्या बाजारपेठा आधीपासूनच सजल्या होत्या. पार वसई-विरार आणि कर्जत-खोपोलीपासून नागरिक मुंबईत खरेदी करण्यासाठी येत असल्याने उत्सवाला काही दिवस असताना खरेदीसाठी झुंबड उडते. आजच्या रविवारच्या दिवशी दादर-परळच्या बाजारात सकाळपासूनच गर्दी झाली होती. रेल्वेनेही दोन्ही मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द केल्याने लोकलही तुडुंब भरून गेल्या होत्या. सजावटीचे साहित्य, फळे आणि हार-फुले घेण्याकडे भक्तांचा विशेष कल होता.

सजावटीचे साहित्य घेण्यासाठी सर्वात जास्त गर्दी लालबाग-परळ, दादर, मशीद बंदर आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाहायला मिळाली. पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार काही मंडळांनी केल्याने त्यासाठीच्या वस्तूंच्या खरेदीलाही चांगलीच पसंती मिळत होती. गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत खरेदी केली. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मूर्ती वाजतगाजत मंडपात आणल्या. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात रस्तोरस्ती ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष कानी पडत होता. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी उत्सव साजरा होत असल्याने यंदा उत्साहाला अधिकच उधाण आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा भाविकांचा कल असल्याने अनेक जण मोरपंख, लाकडापासून तयार केलेल्या वस्तू, विविध आकारांची आकर्षक अशी कागदी फुले, निरनिराळे सागरगोटे इत्यादी सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यावर भर देत होते. शंकर-पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती, मोरावर विराजमान झालेला गणेश, उंदरावर स्वार असलेला बाप्पा आणि मोदकावरील मूर्तीला वाढती मागणी आहे. साईबाबा आणि कृष्णाच्या रूपातील आकर्षक मूर्तींनाही भक्तांची पसंती मिळत आहे.

यंदाच्या वर्षी गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये साधारण २० टक्के वाढ झाली आहे. शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली असून पीओपीच्या तुलनेत त्यांचे दर दुपटीने जास्त आहेत. पीओपीच्या एक फूट मूर्तीची किंमत साधारणतः नऊशे ते एक हजार रुपये आहे. तेवढ्याच आकाराच्या शाडूच्या गणपतीची किंमत १४०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळते. गंडस्थळ मोठे असलेल्या मूर्तीला यंदा जास्त मागणी आहे, असे मूर्तिकार रोहित कंदळगावकर यांनी सांगितले.

लालबाग-परळ आणि दादरमधील मिठाईची दुकानेही गर्दीने फुलून गेल्याचे रविवारी दिसले. भक्तांना आकर्षित करणारे जम्बो मोदक आणि लाडूंचे थर तिथे सजले आहेत. बाजारपेठेतील शोभेच्या वस्तूंची दुकाने तुडुंब भरलेली होती. गल्लोगल्ली विविध गणेश मंडळांचे मंडप उभे राहिले आहेत. मूर्ती आणण्यासाठी रथ सजले आहेत. गल्लीबोळात ढोल-ताशांच्या तालमी रंगत आहेत. त्यामुळे वातावरण गणेशमय झाले आहे. गणेशोत्सव आल्याची प्रचीती भक्तांच्या तयारीतून आणि मुंबईतील बाजारपेठेत चोहीकडे झालेल्या गर्दीतून येत आहे.

सजावटीच्या साहित्यांना सर्वाधिक मागणी
सजावटीच्या वस्तू १० ते २० टक्क्यांनी महागल्या असल्या, तरी भक्तांनी आपला हात आखडता घेतल्याचे फारसे जाणवले नाही. मूर्तीवर काय सुंदर दिसेल, याचा अंदाज घेत भाविक सजावटीच्या विविध दुकानांमध्ये फेऱ्या मारत होते. आकर्षक मखरांपासून कमरपट्टा, छत्र, तोडे, आसन, नारळ, बुगडी, सोनपट्टी, मुकुट, कंठी, बाजुबंद, कर्णफुले आदी विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य हातोहात संपत होते. सार्वजनिक मंडळांबरोबर घरगुती मूर्तीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य घेण्याकरिताही मोठ्या प्रमाणात खरेदीची झुंबड उडाली होती. आरतीसाठी लागणाऱ्या पारंपरिक ढोलकी आणि टाळ घेण्यासाठी लालबागमधील दत्ताराम लाड मार्गावर भक्तांची लगबग सुरू होती.

खरेदीसाठी विशेष कल...
- थर्माकोलची मंदिरे आणि विविध आकाराची मखरे
- झगमगाटासाठी रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा
- चांदीच्या दूर्वा, त्रिशुल आणि मोदक
- १०० ते १५० रुपयांपर्यंत मिळणारे बेन्टेक्सचे दागिने
- बुंदीचे आणि खव्याचे मोदक (५० ते १५० रुपयांत उपलब्ध)
- धूप, कापूर आणि अगरबत्ती

बाप्पासाठी ‘भरजरी’ हार
१. गणेशमूर्तीच्या गळ्यातील हार आणि माळ खास असावी, अशीच सर्व भक्तांची इच्छा असते. त्यांना महत्त्वही फार असते. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ‘भरजरी’ हार दिसून येत आहेत. नेहमीच्या ताज्या फुलांच्या हारांपेक्षाही मोती, मणी आणि खडे जडवलेल्या माळांनाही मोठी पसंती आहे.
२. छोट्या मण्यांचा आणि खड्यांचा मिळून केलेला मोठा गोल मणी मध्यभागी आणि त्याला दोन्ही बाजूंनी तशीच मोतीची सर अशा सात फुटी हाराची किंमत साडेसहा हजार रुपये आहे. त्यातील छोट्या हारांच्या किमतीही हजारांच्या पुढे आहेत. रुद्राक्ष-मणी आणि लाल गोंडे वापरून केलेले हारही साडेसहाशे ते दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, अशी माहिती लालबाग मार्केटमधील विक्रेते गिरीश शिवमते यांनी दिली.
३. कापसाची वा कागदाची पाने-फुले, मोती, खडी आदी वस्तूंपासून बनवण्यात आलेले हार भक्त मोठ्या प्रमाणात घेत आहेत. पारंपरिक पद्धतीने पुठ्ठ्यांवर मोती, चंदेरी कागद आणि फुले वापरून केलेला हार असे किती तरी प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या किमतीही अगदी ५० रुपयांपासून एक हजार रुपयांच्या पुढे असल्याचे दुकानदार गिरीश कारेकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94832 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..