बाप्पाच्या स्वागतासाठी पालघर नगरी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या स्वागतासाठी पालघर नगरी सज्ज
बाप्पाच्या स्वागतासाठी पालघर नगरी सज्ज

बाप्पाच्या स्वागतासाठी पालघर नगरी सज्ज

sakal_logo
By

वसई, ता. २८ (बातमीदार) : दोन वर्ष कोरोनाचे विघ्न, सणासुदीला निर्बंध, मंदिरे बंद यामुळे भाविकांच्या उत्साहावर वीरजण पडले होते. मात्र यंदा बाप्पांच्या स्वागतासाठी पालघर नगरी सज्ज झाली असून बाजारपेठा फुलल्या आहेत. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीकडे भक्तांची पावले वळली आहेत; पण यंदा फुलांचा भाव वधारला असून अनेक वस्तूंवर जीएसटी लागू केला असला तरी नागरिकांत उत्साह कायम आहे.
गणेशोत्सवापूर्वीचा आज शेवटचा रविवार असल्याने पालघर जिल्ह्यात सर्व बाजारपेठांमध्ये कापूर, धूप, सुगंधी अगरबत्ती यासह पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. शोभिवंत आरास खरेदी करून बाप्पाला विराजमान करण्याच्या तयारीला गणेशभक्त लागले आहेत. पालघर, बोईसर, वसई, विरार, डहाणू, विक्रमगड, जव्हार, सफाळे, वाणगाव यासह तलासरीमधील बाजारापेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली.
जिल्ह्यात मोगरा, जास्वंद, चाफा, शेवंती, कागडा यासह विविध फुलांची लागवड केली जाते. सणासुदीच्या काळात यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते, पण यंदा गणेशोत्सवात फुलांचे दर वाढले आहेत, तरीही नागरिक बाप्पांची आरास आकर्षक फुलांनी सजविण्यासाठी फुलांची खरेदी करत आहे. रविवारचा दिवस खास बाप्पांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी राखून ठेवत होता. लाडक्या बाप्पांच्या आगमनाची आतुरता साऱ्यांनाच लागली आहे.
-------------------------
होऊ दे खर्च; भाविकांत उत्साह
अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आल्याने गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य महागले आहे. मात्र याची पर्वा न करता दोन वर्ष साजरा न करता आल्याने बाप्पासाठी होऊ दे खर्च, असा विचार भाविकांनी केला असून खरेदीसाठीचा उत्साह कायम ठेवला असल्याचे दिसून येत आहे.

-----------------------
फुलांचे दर एका दिवसात दुप्पट
पालघर जिल्ह्यात विविध फुलांची लागवड केली जाते. गणपती पूजनासाठी चाफा, जास्वंद, दुर्वा, मोगरा, शेवंती फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते; पण गणेशोत्सवात फुलांचे दर वाढले आहेत. यात शनिवारच्या तुलनेत रविवारी या दरात दुपटीने वाढ झाली आहे. येत्या काळात फुलांचे दर यापेक्षाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
----------------------
कोरोना काळात फूल लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा सणासुदीला फुलांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात फुलांचे दर वाढले आहेत. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कष्टाला, मेहनतीला यश आले आहे.
- भूषण भोईर, फूल उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक
---------------------
फुलांचे दर
फुल शनिवारी - रविवारी
मोगरा - २४० - ६०० (किलो)
सफेद शेवंती - ८० - १२० (किलो)
सायली ५०० - ६०० (किलो)
जास्वंद - ८० - २०० (शेकडा)
चाफा - १६० - २५० (शेकडा)
दुर्वा- ५ - १० (एक जुडी)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94833 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..